फेरविचार याचिका दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:52 IST2019-03-23T22:52:28+5:302019-03-23T22:52:39+5:30
नागरिकांच्या वतीने लवकरच न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

फेरविचार याचिका दाखल करणार
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील शासकीय गायरान व महार हाडोळा जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. यामुळे अतिक्रमणधारकांत भितीचे सावट पसरले असून, या संदर्भात नागरिकांच्या वतीने लवकरच न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
रांजणगावातील शासकीय गट क्रमांक २, ५५,७५, ७६, ७७,७८, ७९, ८२, ८३ व ८४ मधील गायरान व महार हातोळा जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी शेख सिकंदर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश दिले. यासाठी ग्रामपंचायतीला पोलीस संरक्षण पुरविण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात लवकरच अतिक्रमणधारकांना नोटिसाही बजावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायतीमार्फत नागरी सुविधा पुरविण्यात येतात. यापोटी ग्रामपंचायत अतिक्रमणधारकांकडून कराची वसुलीही करीत आहे. आता न्यायालयाने अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश दिल्याने अतिक्रमणधारकांत भितीचे सावट पसरले आहे.
या प्रकरणी लवकरच नागरिकांच्यावतीने उच्च न्यायालयात फेर-विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी २९ मार्च रोजी रांजणगावातील देवगिरी कॉलनीत सायंकाळी ७ वाजता बैठक घेण्यात येत आहे. यात विविध विषयांवर चर्चा केली जाणार असून, बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन कैलास हिवाळे, रावसाहेब भोसले, भगवान साळुंके, जावेद शेख आदींनी केले आहे.
--------------------------