संचिका गायब
By Admin | Updated: March 18, 2017 23:16 IST2017-03-18T23:15:15+5:302017-03-18T23:16:36+5:30
बीड :आतापर्यंत १२२ पैकी केवळ ८४ संचिका आयुक्तांना पाठविल्या आहेत. उर्वरित संचिका शिक्षण विभाग व वेतन निर्वाह भत्ते विभागात नसल्याची माहिती आहे.

संचिका गायब
बीड : शिक्षक भरतीवर बंदी असतानाही शासनाचे आदेश डावलून खाजगी माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना मान्यता देण्यात आल्या होत्या. या संदर्भात आयुक्त कार्यालयाने शिक्षकांना मान्यता दिल्याच्या संचिका मागविल्या होत्या. मात्र, आतापर्यंत १२२ पैकी केवळ ८४ संचिका आयुक्तांना पाठविल्या आहेत. उर्वरित संचिका शिक्षण विभाग व वेतन निर्वाह भत्ते विभागात नसल्याची माहिती समोर आली आहे.
पटसंख्येनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होत नाही तोपर्यंत नवीन नियुक्त्या करु नयेत, असे आदेश २ मे २०१२ मध्ये शासनाने दिले होते. मात्र, बीड जिल्ह्यात तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी खाजगी प्राथमिक शाळांतील ३३ व माध्यमिक विभागातील तब्बल १२२ शिक्षकांना मान्यता दिल्या होत्या. या प्रकरणाची सध्या चौकशी आयुक्त कार्यालयामार्फत सुरु आहे. सर्व कर्मचाऱ्यांना मान्यता दिल्याच्या मूळ संचिका तपासणीसाठी आयुक्त कार्यालयाने मागविल्या आहेत. मात्र, मागील तीन महिन्यांपासून या संचिकांचा थांगपत्ता लागण्यास तयार नाही. आतापर्यंत तीन टप्प्यात केवळ ८४ संचिका आयुक्त कार्यालयास पोहोचत्या झाल्या आहेत. या संचिकांची एक प्रत जि. प. शिक्षण विभाग व एक प्रत वेतन व निर्वाह भत्ते विभागात असणे आवश्यक आहे. मात्र, या दोन्ही विभागांमध्ये संचिकाच नाहीत. संबंधित कर्मचाऱ्यांनाच संचिका सादर करण्याचे आदेश देण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी (मा) विक्रम सारूक म्हणाले, संचिका शोधण्याचे काम सुरू आहे. आयुक्त कार्यालयाच्या चौकशीला संपूर्ण सहकार्य असून, या नियुक्त्या पूर्वीच्या असल्यामुळे त्याबाबत अधिक सांगता येणार नाही. (प्रतिनिधी)