६० जागांसाठी ३४९ जणांत ‘फाईट’

By Admin | Updated: February 7, 2017 23:02 IST2017-02-07T22:58:53+5:302017-02-07T23:02:28+5:30

बीड : शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढविणाऱ्या लढतीचे चित्र मंगळवारी अखेर स्पष्ट झाले

'Fight' for 34 seats in 60 seats | ६० जागांसाठी ३४९ जणांत ‘फाईट’

६० जागांसाठी ३४९ जणांत ‘फाईट’

बीड : शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढविणाऱ्या लढतीचे चित्र मंगळवारी अखेर स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी ३४९ तर पं.स.च्या १२० जागांसाठी ५९८ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी गट, गण मिळून एकूण ११८६ जणांनी माघार घेतली. बहुतांश ठिकाणी चौरंगी, पंचरंगी लढती होताहेत.
जिल्हा परिषदेसाठी ९५९ तर पं.स.साठी १७३५ असे २ हजार ७८ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीमध्ये ६० गटांसाठी ७४९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ४०० जणांनी माघार घेतल्याने आता ३३४ जण रिंगणात शिल्लक आहेत. पं.स.च्या १२० गणांसाठी छाननीअखेर १३८९ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ७९१ जणांनी माघार घेतली. आखाड्यात ५९८ उमेदवार आहेत. या उमेदवारांना मंगळवारी चिन्हांचे वाटपही करण्यात आले.
बीड तालुक्यातील ८ गटांसाठी ६० जण व पं.स. च्या १६ गणांसाठी ९२ जणांमध्ये लढत होणार आहे. चौसाळा गटात सर्वाधिक ११ उमेदवार आखाड्यात आहेत. राकाँतर्फे दत्तात्रय शिंदे, भाजपतर्फे अविनाश मोरे, शिवसंग्रामकडून अशोक लोढा, सेनेकडून विलास शिंदे, काँग्रेसकडून शहादेव हिंदोळे रिंगणात आहेत. राजुरी या गटात ५ उमेदवार असून, भाजपकडून विष्णू खेत्रे, राकाँतर्फे वैजीनाथ तांदळे तर काकू-नाना विकास आघाडीकडून विद्यमान सभापती संदीप क्षीरसागर नशीब अजमावत आहेत. सेनेतर्फे शिवाजी बांगर यांची उमेदवारी आहे. बहीरवाडी गटात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसकडून अशोक हिंगे, काकू-नाना विकास आघाडीकडून सुरेखा रवींद्र क्षीरसागर, सेनेतर्फे नवनाथ प्रभाळे, भाजपतर्फे भूषण पवार हे लढत आहेत. पिंपळनेर गटात अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले गटनेते मदनराव चव्हाण यांच्या पत्नीने माघार घेतली. तेथे भाजपतर्फे सुलभा जाधव, राकाँकडून मंगल डोईफोडे, शिवसेनेकडून वंदना सातपुते, काँग्रेसकडून सैरंद्रा डोईफोडे, क्रांती मोर्चातर्फे सीमा माने यांची उमेदवारी आहे. नाळवंडी गटात शिवसेनेकडून गणेश वरेकर, काकू-नाना आघाडीकडून केशरबाई घुमरे, राकाँकडून अरुण डाके, शिवसंग्रामकडून योगेश शेळके मैदानात आहेत. पाली गटात राकाँकडून उषा आखाडे, काकू-नाना विकास आघाडीकडून सरिता गुजर, शिवसेनेकडून सुरेखा घुगे व भाजपातर्फे सारिका डोईफोडे यांच्यात लढत आहे. नेकनूर गटात भाजपकडून जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या पत्नी सारिका पोकळे, शिवसेनेकडून मुकेश रसाळ, राष्ट्रवादीकडून नारायण शिंदे नशीब अजमावत आहेत. लिंबागणेशमध्ये ७ जणांत सामना रंगेल. राकाँकडून मीरा डोके, शिवसेनेकडून विश्रांती जटाळ, भाजपकडून वैशाली घुमरे, शिवसंग्रामतर्फे जयश्री मस्के नशीब अजमावत आहेत. काकू-नाना आघाडीकडून मीनाक्षी तुपे यांची उमेदवारी आहे.
केजमध्ये ६ जि.प.गटासाठी ३३ तर पं.स.च्या १२ जागांसाठी ५६ उमेदवारांमध्ये चुरस आहे. आडस गटात सर्वाधिक ८ उमेदवार आहेत. रमाकांत मुंडे, विजयकांत मुंडे, विजयकुमार पटाईत, पंडित जोगदंड, डॉ. योगिनी थोरात, संतोष हंगे, विद्यमान सभापती बजरंग सोनवणे, प्रा. सुशीला मोराळे, सुमंत धस, सारिका सोनवणे, विद्यमान उपाध्यक्ष अर्चना कोकाटे (आडसकर) नशीब अजमावत आहेत.
काका-पुतणे आमने-सामने
विडा जि.प. गटात काका-पुतण्यात लढाई आहे. भाजपकडून रमाकांत मुंडे तर भारतीय संग्राम परिषदेतर्फे त्यांचे पुतणे विजयकांत मुंडे आखाड्यात उतरले आहेत. या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे.
पाटोदा तालुक्यात ३ गटांसाठी १८ उमेदवार तर ६ गणांमध्ये ३१ उमेदवार लढत आहेत. अंमळनेर गटात सर्वाधिक १० उमेदवार असून, राकाँतर्फे प्रकाश कवठेकर, सेनेतर्फे अशोक दहिफळे, भाजपकडून अनुरथ सानप लढत आहेत. पारगाव गटात ६ जणांमध्ये सामना रंगणार आहे. विद्यमान सभापती महेंद्र गर्जे राकाँतर्फे तर शोभा नवले भाजपतर्फे मैदानात उतरले आहेत.
गेवराई तालुक्यातील ९ गट व १८ पं.स.साठी अनुक्रमे ५९, ९६ जण रिंगणात आहेत. मंगळवारी जि.प.च्या ३८ तर पं.स.च्या ८० जणांनी माघार घेतली.
धारुर तालुक्यात जि.प.च्या ३ गटांसाठी २० उमेदवार लढत आहेत. पं.स.च्या ५ गणांसाठी ३० जण आखाड्यात आहेत. अखेरच्या दिवशी जि.प.च्या १५ तर पं.स.च्या ३५ जणांनी माघार घेतली. आसरडोह पं.स. गणाचे भाजप उमेदवार शिवाजी काचगुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप आल्याने १० फेब्रुवारी रोजी निर्णय होणार आहे. भोगलवाडी गटात भाजपचे माजी जि.प. सदस्य शिवाजी मुंडे यांनी पत्नीला अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. तेलगाव गटात राकाँतर्फे जयसिंह सोळंके, भाजपकडून विजय लगड, आसरडोह गटात ८ उमेदवारांमध्ये फाईट होणार आहे.
माजलगावात जि.प.च्या ६ जागांसाठी ४५ तर पं.स.च्या १२ जागांसाठी ६९ उमेदवार रिंगणात आहेत. केसापुरी गटात ७, गंगामसला गटात ५, टाकरवणमध्ये १०, तालखेडमध्ये ६, पात्रूड गटात ८, दिंद्रूडमध्ये ९ उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे.
आष्टीमध्ये ७ जि.प. गटातील ५९ पैकी ३० उमेदवारांनी माघार घेतली तर पं.स.च्या १४ गणांमधील १५२ पैकी ९० जणांनी अर्ज मागे घेतले. गट, गणात मिळून ७६ उमेदवार रिंगणात आहेत. दौलावडगाव गटात राकाँतर्फे गोपिका जगताप, भाजपकडून वर्षा माळी, धामणगाव गटात राकाँकडून प्रयागा वनवे, भाजपकडून सविता गोल्हार, शिवसेनेकडून सीमा गर्जे लढत आहेत. धानोरा गटात राकाँकडून संगीता महानोर, भाजपकडून सविता धोंडे, शिवसेनेकडून छाया टकले लढत आहेत. सय्यदमीर लोणी गटातून राकाँतर्फे संध्या गव्हाणे, भाजपकडून शोभा दरेकर, शिवसेनेकडून ज्योती थोरवे, काँग्रेसकडून मीनाक्षी पांडुळे, कडा गटातून राकाँकडून संदीप खाकाळ, भाजपकडून बाळासाहेब आजबे, शिवसेनेकडून अनिल खिळे यांची उमेदवारी आहे. मुर्शदपूर गटात माजी मंत्री सुरेश धस यांच्या पत्नी संगीता धस राकाँकडून लढत आहेत. भाजपकडून नीता शिंदे, शिवसेनेकडून माधुरी चौधरी नशीब अजमावत आहेत. हरिनारायण आष्टा गटातून राकाँतर्फे छाया खाडे, भाजपकडून अर्चना जगताप यांची उमेदवारी आहे.
पिंप्रीतील लढत लक्षवेधी
परळी तालुक्यातील पिंप्री बु. जि.प. गटात राकाँतर्फे अजय मुंडे तर भाजपतर्फे रामेश्वर मुंडे या भावांमध्ये सामना रंगणार आहे. माजी सभापती प्रभाकर वाघमोडे हे शिवसेनेकडून लढत आहेत. या गटात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व पालकमंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
एक गट व तीन गणाच्या अर्ज माघारीची प्रक्रिया प्रलंबित
गेवराई तालुक्यातील चकलांबा गट, शिरुर तालुक्यातील रायमोहा गण व बीड तालुक्यातील बहीरवाडी गणात आक्षेप अर्ज आहेत. त्यामुळे आक्षेप अर्ज न्यायालयाने निकाली काढल्यानंतर तेथील प्रक्रिया पूर्ण होईल. तूर्त या तीनही ठिकाणी अर्ज माघारीची प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली असून, १० फेब्रुवारी रोजी निर्णय होणार आहेत.
छुप्या समीकरणांमुळे ऐन वेळी माघारी
जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये नेते मंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जि.प.चे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने मातब्बरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर छुप्या हातमिळवण्याही झाल्या आहेत. परिणामी काही उमेदवारांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली. परळी तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडीने केली आहे. त्यामुळे भाजपची अडचण झाली आहे. बीड तालुक्यात बहीरवाडी वगळता इतरत्र काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झालेली नाही. भाजप आणि शिवसेनाही स्वतंत्र लढत आहेत. विनायक मेटेंच्या शिवसंग्राम प्रणित संग्राम परिषदेने सोयीनुसार ‘शिट्टी’ वाजविण्याची भूमिका घेतली आहे. परिणामी बहुतांश ठिकाणी चौरंगी, पंचरंगी लढती होत आहेत.
विद्यमान सभापती संदीप क्षीरसागर यांची काकू-नाना विकास आघाडी प्रथमच जि.प., पं.स. निवडणूक लढवत आहे. त्यामुळे राकाँसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

Web Title: 'Fight' for 34 seats in 60 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.