सापडलेले पन्नास हजार रुपये युवकाने केले परत
By Admin | Updated: May 29, 2017 00:33 IST2017-05-29T00:31:22+5:302017-05-29T00:33:07+5:30
वालसावंगी :वृद्धाचे हरवलेले ५० हजार रुपये तरूणाने प्रामाणिकपणा जपत तेवढ्याच तन्मयतेने त्यांना परत केले.

सापडलेले पन्नास हजार रुपये युवकाने केले परत
लोकमत न्यूज नेटवर्क
वालसावंगी : समाजात एकीकडे पैसा हा सर्वस्व मानला जात असताना याच पैशांमुळे नाते-गोतेही दुरावले जात आहेत. मात्र, आजही समाजात काही अशी माणसे आहेत, जी पैशांपेक्षा माणुसकीचा विचार करताना दिसतात. याचाच प्रत्यय रविवारी वालसावंगी आठवडी बाजारात आला. वृद्धाचे हरवलेले ५० हजार रुपये तरूणाने प्रामाणिकपणा जपत तेवढ्याच तन्मयतेने त्यांना परत केले.
भोकरदन तालुक्यातील पद्मावती येथील माणिक शेवाळे हे रविवारी सकाळी भोकदरन तालुक्यातील वालसावंगी येथील आठवडी बाजारासाठी निघाले. बाजारात पोचल्यानंतर त्यांच्या खिशातील
पन्नास हजार पाचशे रुपये रस्त्यात पडले. काही अंतर पुढे गेल्यानंतर खिशातील पैसे पडल्याचे लक्षात येताच शेवाळे यांना धक्का बसला. संपूर्ण रस्त्यावर शोधाशोध करूनही त्यांना पैसे मिळाले नाही. शेवाळे यांनी वालसावंगीतील परिचितांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, किराणा व्यावसायिक राम म्हस्के या तरुणाला रस्त्यावर वृद्धाचे हरवलेले पैसे सापडले. तरुणाने प्रामाणिकपणा दाखवत सरपंच बालू आहेर यांना कुणाचेतरी हरवलेले पन्नास हजार रुपये सापडल्याचे सांगितले.
आहेर यांनी म्हस्के यास सोबत घेऊन शेवाळेंचा शोध घेतला. ते पन्नास हजार ५०० रुपये त्यांना देण्यात आले. ज्या व्यक्तीचे पैसे हरवले असतील त्याची काय अवस्था असेल या विचारातूनच आपण हे पैसे परत केल्याचे राम म्हस्के यांनी सांगितले.