बॅकवॉटरपासून पन्नास फूट खोल चर
By Admin | Updated: April 8, 2017 00:18 IST2017-04-08T00:16:02+5:302017-04-08T00:18:13+5:30
परंडा : परंडा तालुक्यासह करमाळा तालुक्याच्या असंख्य गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या सीना-कोळगाव प्रकल्पाच्या जलसाठ्यातून अवैध मार्गाने पाणी चोरी सुरू आहे.

बॅकवॉटरपासून पन्नास फूट खोल चर
परंडा : परंडा तालुक्यासह करमाळा तालुक्याच्या असंख्य गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या सीना-कोळगाव प्रकल्पाच्या जलसाठ्यातून अवैध मार्गाने पाणी चोरी सुरू आहे. जेसीबी,, पोकलेनसारख्या यंत्राच्या साह्याने सीना-कोळगाव धरण परिसराच्या बॅकवॉटरपासून ५० फूट खोल, ५००० फूट लांब आणि ३० फूट रूंद आकाराची भली मोठी चर खोदून त्यामधून विद्युत मोटारी व इंजीनद्वारे मोठ्याप्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे भविष्यात परंडा तालुक्यावर जलसंकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सीना कोळगाव धरणाची साठवण क्षमता ७६.१९ दलघमी वर्ग मीटर आहे. गेल्या पाच वर्षानतंर २०१६ मध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. धरणला एका बाजूने परंडा तालुक्याने तर दुसऱ्या बाजूला करमाळा तालुक्याचा भाग लागतो. पाच वर्षानतंर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या दरवाज्यातून पाणी सोडण्यात आले होते. धरणात सहा महिन्यापूर्वी ७६.१९ दलघमी पाणी साठा होता; मात्र भरमसाठ उपश्याने पाण्याची पातळी खालावली आहे. डोमगाव, कौडगाव, सोनारी, डोंजा, आलेश्वर, बंगाळवाडी, तांदुळवाडी, देऊळगावसह करमाळा तालुक्यातील भालेवाडी, आर्जुननगर, मिरघवाण, हिवरे, कोळगाव, निमगाव, आवाटी, दिलमेश्वर, करंजा तसेच तांडे, वाड्यांना सीना-कोळगाव धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, येथून सध्या रात्रंदिवस पाणीउपसा सुरु असल्याने पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. दरम्यान, सद्यस्थितीत येथे १९.१७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचे सीना-कोळगाव विभागाचे उपअभियंता एस. एल. मेटकरी यांनी सांगितले.