पन्नास कोटींचा लेंडी प्रकल्प सोळाशे कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:53 IST2017-07-22T00:52:31+5:302017-07-22T00:53:53+5:30
नांदेड: महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील लेंडी प्रकल्प गेल्या ३३ वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे़ ५६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आज सोळाशे कोटींवर पोहोचला आहे़ प्रकल्पाचे काम बंद पाडले आहे़

पन्नास कोटींचा लेंडी प्रकल्प सोळाशे कोटींवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील लेंडी प्रकल्प गेल्या ३३ वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे़ ५६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आज सोळाशे कोटींवर पोहोचला आहे़ मावेजा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी प्रकल्पाचे काम बंद पाडले आहे़ त्यामुळे मावेजाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत या प्रकल्पाच्या किमतीत आणखीन वाढ होणार हे निश्चित़
मुखेड तालुक्यातील गोणेगावच्या लेंडी नदीवर महाराष्ट्र आणि पूर्वीचा आंध्रप्रदेश आणि आताच्या तेलंगणा राज्याकडून या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे़ प्रकल्पाचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन झाले़ या प्रकल्पाअंतर्गत २ हजार ३३१ हेक्टर क्षेत्र हे बुडीत आहे़ ६़३६ टीएमसी साठवणक्षमता असलेल्या या धरणातील महाराष्ट्राच्या ३़९३ टीएमसी तर तेलंगणाच्या वाट्याला २़४३ टीएमसी पाणी येणार आहे़ महाराष्ट्र आणि तेलंगणाचे मिळून एकूण २६ हजार ९२४ हेक्टर क्षेत्राला प्रकल्पाचा लाभ मिळणार असून त्यात महाराष्ट्राचे १५ हजार ७१० तर तेलंगणाचे ११ हजार २१४ हेक्टर एवढे क्षेत्र आहे़ सद्य:स्थितीत या प्रकल्पाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे़ २०१० पर्यंत प्रकल्पावर एक हजार कोटी रुपयांचा खर्च झाला होता़ अनेक वर्षे निधी न मिळाल्याने काम कासवगतीने सुरु होते़ त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढत जाऊन हजार कोटींच्याही पुढे गेली़ गेल्या काही वर्षांपासून मात्र शेतकऱ्यांनी जमिनीच्या मावेजाची रक्कम नव्या धोरणानुसार देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली आहे़ त्यासाठी शेतकऱ्यांचा शासनासोबत संघर्ष सुरु असून २०११ मध्ये शेतकऱ्यांनी काम बंद पाडले़ ते आजपर्यंत सुरुच झाले नाही़
लेंडी धरणालगत बारा गावांचा बुडीत क्षेत्रात समावेश आहे़ त्यातील ११ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही पूर्णपणे मार्गी लागला नाही़