पंधरा वर्षांपूर्वीच्या विहिरीने दिला आधार
By Admin | Updated: February 6, 2015 00:56 IST2015-02-06T00:51:32+5:302015-02-06T00:56:12+5:30
लोहारा : प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील ग्रामस्थांनी गावस्तरावर नियोजन करीत गावचा

पंधरा वर्षांपूर्वीच्या विहिरीने दिला आधार
लोहारा : प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील ग्रामस्थांनी गावस्तरावर नियोजन करीत गावचा पाणीप्रश्न मार्गी लावला आहे. यासाठी पंधरा वर्षांपूर्वी घेतलेल्या विहिरीचा आधार मिळाला असून, ग्रामपंचायतीने स्वखर्चातून पाईपलाईन दुरुस्ती व नवीन पाईपलाईनची कामे पूर्ण केली आहे. त्यामुळे गावात सध्या चोवीस तास मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.
हिप्परगा (राव) हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी आजतागायत कुठलीही योजना राबविण्यात आलेली नाही. शिवाय गावात कुठेही अंतर्गत पाईपलाईन नाही. त्यामुळे नळ कनेक्शनचा प्रश्नच नाही. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सहा टाक्यांवरून नागरिकांना पाणी घेऊन जावे लागते. नाही म्हणायला सन २००१-०२ या वर्षात जीवन प्राधीकरणांतर्गत येथे कायमस्वरूपी योजनेला मुहूर्त सापडले होते. यातून विहीर खोदून गावापर्यंत पाईपलाईनही टाकण्यात आली. मात्र, यानंतर योजनेसाठी निश्चित केलेला कालावधी संपुष्टात आल्यामुळे योजना बंद पडली. त्यामुळे ग्रामस्थांचा पाणीप्रश्न सुटू शकला नाही.
दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात करणसाठी ग्रामपंचायतीकडून स्त्रोतांचे अधिग्रहण केले जात होते. यंदा तर अत्यल्प पावसामुळे उन्हाळ्यापूर्वीच गावकऱ्यांना टंचाईचे चटके बसू लागले आहेत. ग्रामपंचायतीचे गावात तीन विद्युत पंप असले तरी पाणीपातळी खालावल्याने दोन बंद पडले असून, एक पंप शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे यंदा पुन्हा पर्यायी स्त्रोतांचा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर उभा ठाकला.
यावर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्रित येवून २००१-०२ मध्ये जवीन प्राधीकरणांतर्गत योजनेसाठी घेतलेल्या विहिरीचा टंचाई काळात काही वापर होतो का, याबाबत विचारविनिमय केला. तलावात असलेल्या या विहिरीची पाहणी केली असता यात मुबलक पाणीसाठा असल्याचेही दिसून आले आणि हीच विहीर आता आपली पाणीटंचाईतून सुटका करू शकेल, असा विश्वास ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला.
योजना मंजूर झाल्यानंतर या विहिरीपासून गावापर्यंत दोन किमी अंतराची पाईपलाईन टाकण्यात आली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेक ठिकाणी गळती लागली होती. ग्रामपंचायतीने यासाठी स्वनिधी खर्च करून काही ठिकाणी दुरूस्ती तर काही ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून ती गावातील सहाही टाक्यांना जोडण्यात आली आहे. त्यामुळे सध्या गावकऱ्यांना चोवीस तास मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. हिप्परगा ग्रामस्थांनी योग्य नियोजन करून गावचा पाणीप्रश्न मार्गी लावून इतर गावांसमोर आदर्श घालून दिला आहे. (वार्ताहर)