मराठवाड्यातील पंधराशे वाहक पुन्हा येणार सेवेत
By Admin | Updated: April 18, 2016 01:30 IST2016-04-18T01:20:47+5:302016-04-18T01:30:47+5:30
औरंगाबाद : एस. टी. महामंडळातील ११,९८४ निलंबित वाहकांना सेवेत परत घेण्याची घोषणा परिवहनमंत्र्यांनी केली आहे.

मराठवाड्यातील पंधराशे वाहक पुन्हा येणार सेवेत
औरंगाबाद : एस. टी. महामंडळातील ११,९८४ निलंबित वाहकांना सेवेत परत घेण्याची घोषणा परिवहनमंत्र्यांनी केली आहे. यामध्ये मराठवाड्यातील १,५२१ वाहकांना संधी मिळणार असून, काही शर्तींवर त्यांना परत सेवेत घेतले जाणार आहे. परिवहनमंत्र्यांनी केलेल्या घोषणेने राज्यभरातील निलंबित वाहकांना दिलासा मिळाला आहे.
वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अपहाराच्या आरोपानंतर ११,९८४ वाहकांना एस. टी. महामंडळाने निलंबित केले आहे. २००५ पासूनची ही प्रकरणे असून, एस. टी. महामंडळाच्या स्तरावर कार्यवाहीधीन आहेत. या प्रकरणांमध्ये ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची ७,७९० प्रकरणे प्रलंबित आहेत. तर शिक्षा करण्यात आलेल्या वाहकांची २,८७३ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. न्यायालयाने त्यामधील १,१२० प्रकरणांत शिक्षेस स्थगिती दिलेली आहे.
वाहकांच्या अपहारप्रकरणी एस. टी. महामंडळातर्फे शिक्षा देण्यात आल्यानंतर या शिक्षेच्या आदेशाविरुद्ध संंबंधित वाहकांकडून कामगार न्यायालयात अथवा औद्योगिक न्यायालयात दाद मागण्यात येते. त्यामुळे अशा वाहकांच्या न्यायालयीन प्रकरणात एस. टी. महामंडळास न्यायालयीन प्रक्रियेतील तसेच वकिलांच्या सेवामूल्यांपोटी आर्थिक भार सोसावा लागतो. शिवाय वाहकाच्या निलंबनापोटी द्यावयाच्या आर्थिक प्रयोजनामुळेही महामंडळास आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच बराचसा कालावधीही त्यात जातो.
अपहार प्रकरणांमध्ये वाहकाचा न्यायालयीन प्रकरणी होणारा खर्च, कालापव्यय, मानसिक ताण कमी होण्यासाठी, तसेच या सगळ्यांमुळे कुटुंबियांना होणारा मानसिक, आर्थिक त्रास विचारात घेऊन वाहकांची अपहार प्रकरणे निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अटी व शर्ती
काही अटी व शर्र्तींवर ही प्रकरणे निकाली काढण्याचा राज्य परिवहन संचालक मंडळातर्फे निर्णय घेण्यात आलेला आहे. कार्यवाहीधीन ११,९८४ वाहकांना अपहारप्रकरणी महामंडळातर्फे सहानुभूतीपूर्वक विचार करून कुटुंब सुरक्षा योजनेंतर्गत पुनर्नेमणूक देण्यात येईल. त्यासाठी राज्य परिवहन संचालक मंडळासमोर प्रस्ताव सादर करून महामंडळाच्या संचालक मंडळातर्फे वाहकांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यात मराठवाड्यातील १,५२१ वाहकांचा समावेश राहणार आहे.
परिपत्रकानंतर अंमलबजावणी
सद्य:स्थितीत विभागामध्ये वाहकांची संख्या अपुरी आहे. निलंबित वाहकांना पुन्हा सेवेत घेण्यासंदर्भात परिपत्रक येणे अपेक्षित आहे. परिपत्रक प्राप्त होताच त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल.
- एस. एस. रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी, एस. टी. महामंडळ