जंगमने तयार केली बनावट कागदपत्रे
By Admin | Updated: January 17, 2016 23:54 IST2016-01-17T23:44:41+5:302016-01-17T23:54:55+5:30
औरंगाबाद : रिझर्व्ह बँकेच्या ‘एनआरआय’ फंडातून दहा पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या अशोक जंगमने बनावट कागदपत्रे तयार केल्याचा खुलासा रिझर्व्ह बँकेने केला आहे.

जंगमने तयार केली बनावट कागदपत्रे
औरंगाबाद : रिझर्व्ह बँकेच्या ‘एनआरआय’ फंडातून दहा पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या अशोक जंगमने बनावट कागदपत्रे तयार केल्याचा खुलासा रिझर्व्ह बँकेने केला आहे. दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेल्या निवेदिता कुलकर्णी आणि विश्वनाथ अवचट या आरोपींचा जामीन अर्ज लोहमार्ग न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. डोईफोडे यांनी फेटाळला आहे.
अशोक जंगमने रिझर्व्ह बँकेच्या नावे तयार केलेल्या कागदपत्रांची खात्री करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने रिझर्व्ह बँकेची मदत घेतली आहे.
जंगमने तयार केलेली कागदपत्रे पूर्णत: बनावट असल्याचा खुलासा रिझर्व्ह बँकेने आर्थिक गुन्हे शाखेकडे पत्राद्वारे केला आहे. सिडकोतील अभिजित कुलकर्णी यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिल्यानंतर जंगम टोळीचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी जंगमसह निवेदिता कुलकर्णी आणि विश्वनाथ अवचट यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणाला १२ दिवस उलटले असून, आतापर्यंत उस्मानाबाद आणि परभणी अशा दोन ठिकाणच्या गुंतवणूकदारांनीच आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधलेला आहे, तर काही सुशिक्षित गुंतवणूकदार जंगमची सुटका झाल्यानंतर तो आपल्याला दहा पट रक्कम देईल, अशा मतावर ठाम असल्याचे दिसून येते.
जुन्या वाहनांचा छंद
जुनी वाहने खरेदी करून त्यात बदल करण्याचा जंगमला छंद आहे. खरेदी केलेल्या वाहनांची दुरुस्ती करण्यात तो सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत वेळ घालवायचा. त्याने कुर्ला, चेंबूर येथील उड्डाणपुलाखालील पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या तीन कारवर सुमारे अडीच ते तीन लाख रुपये खर्च केला, तर अन्य एक कार भंगार अवस्थेत उभी असल्याचे पोलिसांनी सांगितले.