भरधाव ट्रकने ट्रिपलसीट दुचाकीस्वारांना उडवले, तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 18:43 IST2017-08-21T18:42:59+5:302017-08-21T18:43:11+5:30
जालन्याकडून वाळूज एमआयडीसीकडे सुसाट निघालेल्या मालवाहून ट्रकने ट्रिपलसीट मोटारसायकलस्वारांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात तीन जखमी झाले.

भरधाव ट्रकने ट्रिपलसीट दुचाकीस्वारांना उडवले, तीन जखमी
औरंगाबाद, दि. २१ : जालन्याकडून वाळूज एमआयडीसीकडे सुसाट निघालेल्या मालवाहून ट्रकने ट्रिपलसीट मोटारसायकलस्वारांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात तीन जखमी झाले. यात एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात दुपारी ३ वाजेच्या सुमारास बीड बायपास रोडवरील महनगर चौकाजवळ घडला.
संतोष गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, आणि अनिल बोलकर(सर्व रा. फुलेनगर, उस्मानपुरा)अशी जखमींची नावे आहेत. जखमींपैैकी संतोषची प्रकृती चिंताजनक असल्याचे सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे यांनी सांगितले. या अपघाताविषयी ते म्हणाले की, फुलेनगर येथील रहिवासी तिन्ही तरूण मोटारसायकलने क्रमांक(एमएच२०बीए३०५८) महुनगरकडे बीड बायपासने जात होते. यावेळी त्यांच्या मागून देवळाई चौकाकडून आलेल्या मालवाहू ट्रकने(जीजे १० डब्ल्यू ६९३३)त्यांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीसह तिघेही रस्त्यावर जोरात आदळले आणि ट्रकच्या खाली आले.
या अपघातात संतोष गायकवाडच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो घटनास्थळीच बेशुद्ध पडला. तर अन्य दोघेही जखमी झाले. मात्र त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊ न जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात त्यांनी दाखल केले.