कुंपणच वन खातेय!
By Admin | Updated: July 3, 2017 01:04 IST2017-07-03T01:01:49+5:302017-07-03T01:04:47+5:30
औरंगाबाद : एकीकडे राज्यभरात वृक्षलागवडीचे मिशन जोरात सुरू असताना औरंगाबादपासून साधारण २५ कि.मी. अंतरावर सारोळा जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.

कुंपणच वन खातेय!
गजानन दिवाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एकीकडे राज्यभरात वृक्षलागवडीचे मिशन जोरात सुरू असताना औरंगाबादपासून साधारण २५ कि.मी. अंतरावर सारोळा जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.
साधारण १६० पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आणि बाभूळ, करवंद, आमटी हे झुडपी वृक्ष येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. राज्यभरात वृक्षलागवड मोहीम जोरात असताना सारोळा जंगलात मात्र दोन दिवसांपासून मोठी वृक्षतोड केली जात आहे. रविवारी सकाळी पक्षीमित्र पंकज शक्करवार, रूपाली शक्करवार आणि अश्विनी मोहरीर या परिसरात गेले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या झाडांना कुंपण करण्यासाठी झाडांची ही कत्तल केली जात आहे. तोडण्यात आलेले हे जंगल साधारण नऊ ते दहा ट्रॅक्टर भरतील, एवढे असल्याचे शक्करवार यांनी सांगितले. बाभळीच्या जंगलात बुलबुल घरटी घालते, करवंदाच्या जंगलात वटवट्या घरटी घालतो, तर आमटी-करवंदाच्या फळांचा हाच कार्यकाळ असून, पक्ष्यांचे ते प्रमुख खाद्य आहे. पक्ष्यांना व्हिटॅमिन सी याच फळांतून मिळते. मिक्स हॅबिटाट असलेले व जैवविविधेत मोठा वाटा असलेल्या या जंगलावर कुऱ्हाड चालविली जात आहे.