घरापेक्षा शेतकऱ्यांना ऊस गाळपाची भीती
By Admin | Updated: November 28, 2014 01:13 IST2014-11-28T00:32:24+5:302014-11-28T01:13:30+5:30
विठ्ठल भिसे ,पाथरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी ऊस उत्पादित केल्यानंतर आपला ऊस कारखान्याने गाळप करावा, अशी चिंता लागून राहते. उसाचे क्षेत्र कमी असो की,

घरापेक्षा शेतकऱ्यांना ऊस गाळपाची भीती
विठ्ठल भिसे ,पाथरी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी ऊस उत्पादित केल्यानंतर आपला ऊस कारखान्याने गाळप करावा, अशी चिंता लागून राहते. उसाचे क्षेत्र कमी असो की, जास्त मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळप होईपर्यंत चिंता लागू राहिेलेली असते. यामुळे उसाला भाव कितीही द्या मात्र ऊस गाळपास वेळेवर न्या, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.
पाथरी तालुका हा जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात आणि गोदावरी नदीच्या पट्यामध्ये येतो. गोदावरी नदीच्या पात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे उच्च पातळीचे बंधारे उभारण्यात आले आहेत. जायकवाडीचे पाणी व गोदावरी पात्रातील बंधाऱ्याचे पाणी यामुळे या भागात मागील २० वर्षापासून शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड करतो. पाथरी येथे सहकार तत्वावर सुरू करण्यात आलेल्या गोदावरी दुधना कारखान्यावर या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती घडून आली होती. कालांतराने कारखान्याचे दृष्टचक्र फिरून कारखाना आवसायानात निघाला त्यानंतर शासनाने हा कारखाना विक्री केला.
सध्या कारखान्याची विक्री प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्याने रेणुका शुगरच्या माध्यमातून हा कारखाना खाजगी तत्वावर २००८ पासून सुरू आहे. त्याचबरोबर लिंबा येथील योगेश्वरी शुगर हा खाजगी कारखानाही आहे.
या तालुक्यात दोन खाजगी कारखाने असतानाही या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव कधी मिळालाच नाही. कारखान्याची गाळप यंत्रणा व्यवस्थितरित्या राबविली न जात असल्याने शेतकऱ्यांना ऊस गाळपास जाईपर्यंत त्रास सहन करावा लागतो. या दोन्ही कारखाना कार्यक्षेत्रामध्ये साधारणत: ४ लाख मे.टन ऊस उपलब्ध आहे. पावसाळ्याच्या दिवसात योग्य प्रमाणात पाऊस पडला नाही. पर्यायाने उसाची वाढ मोठ्या प्रमाणावर खुंटली गेली आहे. सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनाच यावर्षी चांगला उतारा येत आहे. सरासरी उतारा ग्रहीत धरला तर एकरी २५ टनही उसाला उतारा येत नाही. ऊस लागवडीपासून कारखान्याला गळीत हंगामाला जाईपर्यंत शेतकरी कष्ट करतो. परंतु, दरवर्षी कारखाना सुरू झाला की, शेतातील ऊस गाळप करण्यासाठी शेतकरी, ऊस तोडणी मुकदम शेतकी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे लागेबांधे करून ऊस तोडणी यंत्रणा शेतामध्ये घेऊन जातो. कोणता कारखाना आपल्या उसास जास्त भाव देणार आहे याची चिंता कधी शेतकरी करीत नाही.
यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकरी उसाचे पीक घेतो खरे परंतु, त्याच्या पदरात मात्र काही पडत नाही. उसाच्या अशा परिस्थितीमुळे गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र कमी करून कापूस आणि सोयाबिनचे पीक घेतले. परंतु, शेतकऱ्यांच्या कापूस आणि सायोबीन या पिकालाही उतारा मात्र आला नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक नाडी मात्र बिघडून गेली आहे.