परळीच्या वस्तीला डोंगराची भीती
By Admin | Updated: August 4, 2014 00:48 IST2014-08-04T00:05:59+5:302014-08-04T00:48:21+5:30
परळी: बीड जिल्ह्यातील आजही अनेक तालुक्यातील छोटे-मोठी गावे, वाड्या, वस्त्या, डोंगरदरीत वसलेल्या आहेत. माळीणच्या दुर्दैवी घटनेनंतर डोंगरदऱ्यात वसलेल्या या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परळीच्या वस्तीला डोंगराची भीती
परळी: बीड जिल्ह्यातील आजही अनेक तालुक्यातील छोटे-मोठी गावे, वाड्या, वस्त्या, डोंगरदरीत वसलेल्या आहेत. माळीणच्या दुर्दैवी घटनेनंतर डोंगरदऱ्यात वसलेल्या या गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक क्षणी त्यांच्या मनात माळीणचीच पुनरावृत्ती आपलेकडेही होते की काय ? अशी भीती जाणवत असल्याचे दिसून येत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. या लोकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणीही जोर धरत आहे. परळी शहरातील काही वस्त्या जवळपास डोंगराशेजारीच वसलेले आहे.
शहरातील मेरू पर्वतासमोरील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मागील परिसरात अनधिकृतपणे डोंगरुन पोखरुन मुरुम काढला जात आहे. यामुळे डोंगराचे सपाटीकरण होत असून, त्यांचे सौंदर्यही गायब होत आहे. डोंगर पोखरल्यामुळे तो भुसभसीत झाला आहे. डोंगर भुसभसीत झाल्याने तो कधीही कोसळू शकतो? अशी भीती येथील रहिवाशांच्या मनात नेहमी असल्याचे दिसून येत आहे. मात्र माळीणच्या दुर्दैवी घटनेनंतर यामध्ये आणखीनच भर पडली आहे.
डोंगर पोखरुन मुरुमाची विक्री केली जाते. हा सर्व प्रकार प्रशासनाच्या संगनमतानेच झाला आहे. याप्रकाराची कसून चौकशी होणे आवश्यक आहे. आजही डोंगरात ब्लास्टिंग करुन दगड, मुरुम काढले जात आहेत. याकडे महसूल प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. मागील अनेक दिवसांपासून डोंगराची ब्लास्टिंग करण्यास प्रशासनाचेच सहकार्य असल्याचा आरोप भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा, नरेश पिंपळे यांनी केला आहे.
डोंगरालगत घरे
येथील ग्रामीण पोलीस ठाणेही डोंगरावरच आहे. त्याखाली बसवेश्वर कॉलनी आहे. या कॉलनीत राहणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे काही घरे तर डोंगरावरच वसलेली असून, पावसाळ्यात येथील रहिवाशांची चांगलीच तारांबळ उडते.
मेरू पर्वत निसर्गरम्य ठिकाण म्हणून तालुक्यात ओळखले जाते. तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत मेरूगिरी उद्यान व भक्त निवास इमारत उभारण्यात आली. त्यामुळे येथे भाविकांसह फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. एवढी वर्दळ असतानाही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महादेव ईटके, उमेश खाडे यांनी केला आहे. (वार्ताहर)
पाहणी करुन कारवाई करू- चौधर
हा डोंगर पोखरुन मुरुम, दगड विक्री केले जात असतील तर संबंधितांवर थेट कारवाईचा बडगा उगाराला जाईल, असे उपविभागीय अधिकारी सविता चौधर यांनी सांगितले.
या डोंगराची आम्ही पाहणी करुन त्यावर निर्णय घेऊ
आमचे अधिकारी, कर्मचारी या डोंगराची पाहणी करुन वरिष्ठांकडे अहवाल पाठवू
परिसरातील रहिवाशांनीही काळजी घेण्याची गरज असून, प्रशासनालाही सहकार्य करावे
डोंगर पोखरणे थांबवावे.