दुष्काळाच्या भीतीने शेतकऱ्यांना चिंता
By Admin | Updated: August 5, 2015 00:35 IST2015-08-05T00:10:52+5:302015-08-05T00:35:24+5:30
दिंद्रूड : पावसाने गुंगारा दिल्याने आतापर्यंत कशीबशी तग धरुन ठेवलेल्या पिकांनीही धीर सोडला आहे. शिवारातील कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर आदी पिके करपून गेली आहेत

दुष्काळाच्या भीतीने शेतकऱ्यांना चिंता
दिंद्रूड : पावसाने गुंगारा दिल्याने आतापर्यंत कशीबशी तग धरुन ठेवलेल्या पिकांनीही धीर सोडला आहे. शिवारातील कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर आदी पिके करपून गेली आहेत. पाऊसच नाही पडला तर या अनामिक भितीने शेतकऱ्यांचा थरकाप उडाला आहे.
यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पाऊस पडण्याने शेतकऱ्यांनी आनंदात पेरणी उरकून घेतली. त्यानंतर थोड्याफार आलेल्या रिमझिम पावसाने बिजे अंकुरली. मात्र आज उद्या येईल, या आशेवर शेतकरी असतानाच पावसाने दांडी मारल्याने उगवलेली पिके करपून गेली आहेत. काही शेतकऱ्यांनी तर पिकांची आशा सोडून पिकांवर नांगर फिरवला आहे.
दिंद्रूडसह पंचक्रोशीतील चाटगाव, संगम, देवदहिफळ, जवळा, नाकलगाव, पिंपळगाव, आलापूर, बेलुरा, शिंदेवाडी, चोपनवाडी, खाडेवाडी आदी गावातील कापूस, तूर, तीळ, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिके जळून जात आहेत. खरीप तर १०० टक्के हातचे गेले आहे. मात्र पाऊस नाही पडला तर रबीचे काय होईल? अशी अनामिक भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या पशुधनासाठी लागणारी वैरण संपत आली आहे तर काही शेतकऱ्यांना काय खायला घालावे ही पंचाईत पडली आहे. मात्र गोवंश हत्याबंदी कायदा करणारे सत्ताधारी जनावरांच्या चारा, पाण्यासाठी काहीही उपाययोजना करताना दिसत नाहीत. अशीच परिस्थिती राहिली तर काय करावे? या भीतीपोटी शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. तसेच विहिरी कोरड्या पडल्या असून, बोअरबंद पडले आहेत. तलाव तर उन्हाळ्यातच कोरडेठाक झालेले आहेत.
पिण्याचे पाणी पडले आहेत. तलाव तर उन्हाळ्यातच कोरडेठाक झालेले आहेत. पिण्याचे पाणी आणायचे कोठून? या विवंचनेत असलेले शेतकरी वरुणराजाची कृपा कधी होतेय, या आशेवर जगत आहे. (वार्ताहर)