- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : ‘मी मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील. घरी जेमतेम दीड एकर कोरडवाहू शेती. त्यात खाणाऱ्या तोंडांची कमी नाही. आई-बाप दिवसभर शेतात राबतात, तेव्हा कुठे दोन घास पोटात जातात. ही हलाखीची परिस्थिती बदलायची असेल, तर सरकारी नोकरीशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच अंगावर खाकी चढवण्यासाठी मी जिवाचं रान करतोय...’ हे बोल आहेत, पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून भरतीसाठी आलेल्या २१ वर्षीय तरुणाचे.
टी.व्ही. सेंटर परिसरातील ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर सध्या पोलिस भरतीची धामधूम सुरू आहे. मैदानी चाचणीनंतर ‘लोकमत’ने या तरुणांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला असता, गरिबीवर मात करण्यासाठी चाललेली त्यांची धडपड आणि वर्दीचे आकर्षण दिसून आले.
वर्दीसाठी संघर्षबुलढाणा जिल्ह्यातील पाडळीशिंदे गावातील मनोज जाधव हा तरुण दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहे. घरच्या दीड एकर कोरडवाहू शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने २०२१ पासून त्याने पोलिस भरतीची तयारी सुरू केली होती. मैदानी चाचणीत ५० पैकी ४१ गुण मिळवल्याचे सांगत, ‘यंदाच्या भरतीत मी नक्कीच पोलिस होणार’ असा ठाम विश्वास त्याने व्यक्त केला. तशीच कहाणी मेहकर येथील सुमित शेजुळ आणि वैजापूरच्या विरगाव येथील सौरभ थोरात यांची. ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय आणि शेतकरी कुटुंबातून आलेल्या या तरुणांना त्यांच्या घरच्या परिस्थितीनेच पोलिस दलात जाण्याची प्रेरणा दिली आहे. ‘आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर असल्यानेच मैदानात धावताना थकवा जाणवत नाही’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
मुलाच्या यशाकडे ‘त्यांचे’ डोळेएकीकडे मुले मैदानात घाम गाळत असताना, मैदानाबाहेर त्यांचे पालकही तितक्याच आशेने वाट पाहत होते. नेवासा येथील पीयूष पवार हे आपल्या मुलासाठी आले होते. ते म्हणाले, ‘माझे गावात छोटेसे चहाचे हॉटेल आहे. पण, मुलाला पोलिसाच्या वर्दीत पाहण्याचे माझे स्वप्न आहे. खासगी नोकरीत वर्षानुवर्षे राबूनही हाती काही लागत नाही, त्यापेक्षा सरकारी नोकरी कधीही चांगली.’
मुलाने काहीतरी करून दाखवावेतर, शहरातील रिक्षाचालक दादासाहेब सोनवणे यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, ‘मी दुसऱ्याची रिक्षा भाड्याने चालवून पोट भरतो. आयुष्यात मी फार काही करू शकलो नाही, याची खंत वाटते. पण, मुलाने काहीतरी करून दाखवावे, अशी इच्छा आहे. पोलिसासारखा रुबाब आणि सन्मान दुसऱ्या नोकरीत नाही, त्यामुळेच त्याला पोलिस करण्यासाठी मी धडपडत आहे,’ असे त्यांनी सांगितले.
Web Summary : Rural Maharashtra's youth strive for police jobs, escaping poverty. Driven by family hardship, they excel in physical tests, fueled by parents' dreams of stable government careers and social respect. Their hard work reflects a burning desire for a better future.
Web Summary : महाराष्ट्र के ग्रामीण युवा गरीबी से बचने के लिए पुलिस की नौकरी पाने का प्रयास कर रहे हैं। पारिवारिक कठिनाइयों से प्रेरित होकर, वे शारीरिक परीक्षणों में उत्कृष्ट प्रदर्शन करते हैं, उनके माता-पिता के स्थिर सरकारी करियर और सामाजिक सम्मान के सपने उन्हें प्रेरित करते हैं। उनकी मेहनत बेहतर भविष्य की तीव्र इच्छा को दर्शाती है।