मुलाच्या साक्षीवरून बापाला जन्मठेप
By Admin | Updated: November 30, 2014 01:01 IST2014-11-30T00:23:46+5:302014-11-30T01:01:20+5:30
औरंगाबाद : स्वत:च्या मुलाचा गळा चिरून त्याचा खून करणाऱ्या निर्दयी बापाला दुसऱ्या मुलाच्या साक्षीवरून प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुमंत कोल्हे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

मुलाच्या साक्षीवरून बापाला जन्मठेप
औरंगाबाद : स्वत:च्या मुलाचा गळा चिरून त्याचा खून करणाऱ्या निर्दयी बापाला दुसऱ्या मुलाच्या साक्षीवरून प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुमंत कोल्हे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
हेमराज बाबू राठोड (३५, रा. उप्पलखेडा, ता. सोयगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, उप्पलखेडा येथील रहिवासी असलेला आरोपी हा पत्नी लताबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे.
त्याला दारूचे व्यसन असून तो सतत पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करीत असे. त्याच्या या त्रासाला कंटाळून ती माहेर असलेल्या निलजखेडा तांडा (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे मुलगा अजय (वय ११) आणि विजय (५) यांच्यासह राहण्यास गेली होती. १६ फेब्रुवारी २०१० रोजी आरोपी हेमराज हा निलजखेडा तांडा येथे गेला आणि पत्नी आणि दोन्ही मुलांना गावी चालण्याचा तगादा लावू लागला. पत्नीने उप्पलखेडा येथे त्याच्या सोबत जाण्यास नकार दिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दोन्ही मुलांना बसस्थानकावर खाऊ घेऊन देतो, असे सांगून त्यांना सोबत घेऊन गेला. त्याच दिवशी रात्री ८ वाजेच्या सुमारास पळसखेडा शिवारातील (ता. सोयगाव) रस्त्याशेजारील गरमल लाला राठोड यांच्या शेतात दोन्ही मुले बेवारस अवस्थेत पडलेली असल्याचे दूधविक्रेता राजू मरमट यांना दिसली. त्यांनी ही बाब गावकरी आणि सोयगाव पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा ११ वर्षीय अजयचा करवतीने गळा चिरून खून करण्यात आल्याचे तसेच विजयचा गळा आवळून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो काही वेळानंतर शुद्धीवर आला. त्याने वडिलांनीच अजयचा खून केल्याचे तसेच त्याचाही गळा आवळल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी लताबाई राठोडच्या तक्रारीवरून आरोपी हेमराज राठोड विरोधात खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक सी.पी. नागरगोजे यांनी तपास करून जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी न्यायाधीश सुमंत कोल्हे यांच्यासमोर झाली तेव्हा सरकारपक्षाकडून सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाट यांनी सहा साक्षीदार तपासले.
याप्रसंगी चिमुकल्या विजयची साक्ष महत्त्वाची ठरली. त्याच्या साक्षीवरूनच स्वत:च्या निर्दयी हेमराजला खुनाच्या आरोपावरून जन्मठेप आणि ५०० रुपये दंड ठोठावला.
दंड न भरल्यास ३ महिने कारावास, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ७ वर्षे सक्तमजुरी आणि ३०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास, अशी शिक्षा ठोठावण्यात आली. (प्रतिनिधी)