ग्रामस्थांचे तहसीलसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 00:55 IST2016-07-23T00:45:00+5:302016-07-23T00:55:16+5:30

कळंब : तालुक्यातील मोहा येथील मोहा तो कोकाटे वस्ती या रस्त्याचे मातीकाम लोकसहभागातून सुरू करण्यात आले होते. परंतु, सदरील कामास काही शेतकऱ्यांकडून विरोध झाल्याने ते बंद पडले.

Fasting before the tehsil of the villagers | ग्रामस्थांचे तहसीलसमोर उपोषण

ग्रामस्थांचे तहसीलसमोर उपोषण


कळंब : तालुक्यातील मोहा येथील मोहा तो कोकाटे वस्ती या रस्त्याचे मातीकाम लोकसहभागातून सुरू करण्यात आले होते. परंतु, सदरील कामास काही शेतकऱ्यांकडून विरोध झाल्याने ते बंद पडले. सदरील काम सुरू करण्यात यावे, या प्रमुख म्हणून शुक्रवारी मोहा येथील ग्रामस्थांनी शाळकरी मुले, महिलांसह तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केल आहे.
मोहा गावापासून अंदाजे सातशे मिटर अंतरावर कोकाटेवस्ती आहे. याठिकाणी काही कुटूंब वस्ती करुन राहतात. याच ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळाही आहे. गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने शेतकरी, शाळकरी मुलांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ता तयार करावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. परंतु, शासन पुढाकार घेत नसल्याने स्थानिकांनी पुढाकार घेवून लोकसहभागातून या रस्त्याचे मातीकाम सुरू केले होते. ६०० मिटर काम करण्यात येणार होते. परंतु ४०० मिटरच्या आसपास काम पूर्ण झाल्यानंतर सर्व्हे क्र. ७७, १०७१ मधील शेतकऱ्यांनी नकाशाप्रमाणे काम करावे, असे सांगून काम रोखले. त्यावर ग्रामस्थांनी या प्रकरणी तहसील कार्यालयाकडे तक्रार करून खुणा करुन देवून रस्ता कामाचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी केली होती.
त्यानुसार २० जुलै रोजी मंडळ अधिकारी मोहा व भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमक्ष खुणा करुन देण्यात आल्या व काम सुरू करण्यात आले. परंतु अधिकारी गेल्यानंतर पुन्हा काही शेतकऱ्यांनी हे काम अडवले. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करीत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार मोहा ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळपासून कळंब तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
आंदोलनात माजी जि.प. सदस्य संदीप मडके, सोमनाथ मडके, मारूती कोकाटे, नवनाथ कोकाटे, तुळशीराम कोकाटे, लक्ष्मन कोकाटे, मनिषा कोकाटे, विमल कसबे, सरस्वती कोकाटे यांच्यासह स्थानिक नागरिक महिला, शाळकरी मुलेही सहभागी झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Fasting before the tehsil of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.