आईच्या अश्रूंमुळे घेतले रुग्णसेवेचे व्रत

By Admin | Updated: May 12, 2016 01:01 IST2016-05-12T00:06:47+5:302016-05-12T01:01:08+5:30

औरंगाबाद : लहानपणाचा तो प्रसंग आजही आठवतो. आजारी पडल्यामुळे आईने मला रुग्णालयात नेले होते. मी आजारी असताना आईच्या डोळ्यात अश्रू आले होते.

Fasting of the patient taking care of mother's tears | आईच्या अश्रूंमुळे घेतले रुग्णसेवेचे व्रत

आईच्या अश्रूंमुळे घेतले रुग्णसेवेचे व्रत

औरंगाबाद : लहानपणाचा तो प्रसंग आजही आठवतो. आजारी पडल्यामुळे आईने मला रुग्णालयात नेले होते. मी आजारी असताना आईच्या डोळ्यात अश्रू आले होते. या अश्रूंनी मला मात्र कधी स्वस्थ बसू दिले नाही. तेव्हाच रुग्णसेवेचे व्रत हाती घेण्याचे ठरविले. गेल्या ३२ वर्षांच्या कार्यकाळात रुग्णांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, याचीच काळजी घेतली आणि हाच माझ्या आईचा खरा सन्मान आहे, असे घाटीतील परिसेविका रजनी देहाडे भावनिक होऊन सांगत होत्या.
जगभरात १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त घाटी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १९ येथील परिसेविका रजनी देहाडे यांच्याशी संवाद साधण्यात आला.
रजनी देहाडे यांनी या वॉर्डात अनेक छोट्या-छोट्या गोष्टीतून रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद वाढविण्याचा प्रयत्न केला. या वॉर्डात येणाऱ्या प्रत्येक रुग्णासोबत आपुलकीचे नाते निर्माण होते. त्यामुळे येथून बरा होऊन जाणारा प्रत्येक रुग्ण डॉक्टरांबरोबर परिचारिकांची आवर्जून कृतज्ञता व्यक्त करतो.
रुग्णास चांगले वातावरण मिळावे, यासाठी रजनी देहाडे यांनी वॉर्डात अत्यावश्यक सोयी-सुविधा आणि स्वच्छतेवर भर दिला. त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. शिवाय आपले घर समजून काम करावे, यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. कर्मचाऱ्यांकडून त्यास प्रतिसादही मिळाला. उपचारासाठी येणारा रुग्ण आणि नातेवाईक आजारपणामुळे दु:खी असतात. त्यामुळे त्यांना समजून घेण्याची गरज असते.
घाटीत ७७७ परिचारिकांवर
३000 रुग्णांचा भार
औरंगाबाद : मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांमधील गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण असलेल्या घाटी रुग्णालयात ७७७ परिचारिकांवर दररोज तब्बल ३ हजार रुग्णसेवेचा भार आहे. ११५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा ताण वाढतो; परंतु कोणतीही तक्रार न करता परिचारिका रुग्णांची नि:स्वार्थपणे सेवा करीत आहेत.
घाटी रुग्णालयात अहोरात्र सेवा करून रुग्णांना जीवनदान देणाऱ्या घाटीतील परिचारिकांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. परिचारिका रुग्णसेवेबरोबर रुग्णांना येणाऱ्या अडचणी आणि संकटांवर मात करण्यासाठीही प्रोत्साहन देतात. रुग्णांना आरोग्य सेवा देताना कुठलीही हयगय होणार नाही, याची काळजी घेतात. त्यामुळे रुग्णालयात डॉक्टरांबरोबर परिचारिकाही महत्त्वाची भूमिक ा पार पाडत आहेत. संख्याबळ कमी असतानाही तारेवरची कसरत करीत त्या सेवा देत आहेत. घाटी रुग्णालयात दररोज ३ हजार रुग्ण तपासले जातात. शेकडो रुग्णांची भरती होते; पण परिचारिका मनोभावे आपले कार्य करताना आढळतात.
केरळहून शहरात
तरुणींचा ओढा वैद्यकीय, बँकिंग इ. क्षेत्रांकडे जाण्याचा असतो; परंतु आता नर्सिंग क्षेत्राकडेही त्यांचा कल वाढत आहे. राज्यात नर्सिंगचे शिक्षण चांगले असल्याने केरळहून अनेक विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. घाटी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये केरळी परिचारिकांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. आरोग्य क्षेत्राबाबत जनजागृती झाल्याने या क्षेत्रातही तरुणी पुढे येत आहेत.
महत्त्वाची भूमिका
कुशल व्यवस्थापन, व्यावसायिक कौशल्य आणि वक्तशीरपणा या वैशिष्ट्यांसह परिचारिका रुग्णांना दिवस-रात्र सेवा देतात. त्यामुळे घाटीतील वैद्यकीय सांघिक कार्यात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची आहे.
-डॉ. सुहास जेवळीकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी
जवानाने केला सलाम
या वॉर्डात हर्निया झालेल्या एका जवानावर नुकतेच उपचार झाले. देशाचा संरक्षण करणारा हा जवान होता; परंतु तरीही त्याने आमच्याकडून कोणत्याही सोयी-सुविधांची अपेक्षा व्यक्त केली नाही. परंतु तरीही आम्ही त्याच्याकडे अधिक लक्ष दिले. कारण तो देशाच्या सीमेवर आमचे रक्षण करतो. त्यामुळे त्याचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी होती. चांगल्या उपचारामुळे जाताना त्याने आमच्या कार्याला सॅल्युट केल्याचे रजनी देहाडे यांनी सांगितले.

Web Title: Fasting of the patient taking care of mother's tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.