महिला लोकशाही दिनाचा नुसताच फार्स !

By Admin | Updated: November 18, 2014 01:07 IST2014-11-18T00:40:29+5:302014-11-18T01:07:25+5:30

लातूर : दोन वर्षांपासून राज्य शासनाने जिल्हा व तालुका स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे़ दर महिन्याच्या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी लोकशाही दिन घेतला जातो़

Fashions of women's democracy day! | महिला लोकशाही दिनाचा नुसताच फार्स !

महिला लोकशाही दिनाचा नुसताच फार्स !



लातूर : दोन वर्षांपासून राज्य शासनाने जिल्हा व तालुका स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे़ दर महिन्याच्या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी लोकशाही दिन घेतला जातो़ लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत पंधरा लोकशाही दिन झाले आहेत़ या लोकशाही दिनात आतापर्यंत केवळ पाच तक्रारी गुदरल्या असून, त्या पैकी चार तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे़ लोकशाही दिनात महिलांच्या तक्रारींचा ओघच नाही, त्यामुळे लोकशाही दिनाचा नुसताच फार्स ठरत आहे़ काल सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात प्रलंबित एका तक्रारीवर चर्चा करण्यात आली़ मात्र या तक्रारीवर अंतिम निर्णय होऊ शकला नाही़
महिला तक्रारींचे निवारण करण्यासाठी महिला लोकशाही दिनाची संकल्पना लातुरात १५ एप्रिल २०१३ रोजी अस्तित्वात आली़ लातुरात झालेल्या पहिल्या लोकशाही दिनातही केवळ एकच तक्रार होती़ त्यानंतर १७ नोव्हेंबर २०१४ पर्यंत १५ लोकशाही दिन झाले़ या लोकशाही दिनामध्ये आतापर्यंत केवळ पाच तक्रारी आल्या आहेत़ त्यापैकी चार प्रकरणांचा निकाल लागला असून, तक्रारकर्त्यांच्या बाजूने जिल्हाधिकारी यांनी निर्णय दिला आहे़ एवढी जमेची बाजू वगळता महिला लोकशाही दिनाचा नुसताच फार्स ठरत आहे़ गेल्या महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आलेली तक्रारच या महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात चर्चेला आली़ अहमदपूर तालुक्यातील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी दिलेल्या जागेच्या मावेजासंदर्भात ही तक्रार होती़ तालुका स्तरावरील लोकशाही दिनातून ही तक्रारी जिल्ह्याच्या लोकशाही दिनात आली आहे़ गेल्या लोकशाही दिनापासून या तक्रारीवर खल होत आहे़ मात्र निर्णयापर्यंत चर्चा होऊ शकली नाही़ जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना स्मशानभूमीसाठी पर्यायी जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले. पर्यायी जागेचा शोध घेण्यास किती दिवस लागतील, याचा नेम नाही़ तोपर्यंत तक्रारकर्त्या महिलेला ताटकळत रहावे लागेल. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनात तक्रारींचे निवारण केले जाते़ या लोकशाही दिनाला जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, महिला व बालविकास अधिकारी तसेच ज्या विभागाअंतर्गत तक्रारी आहेत त्या विभागाचे प्रमुख उपस्थित असतात़ परंतु गेल्या १५ लोकशाही दिनाचा अनुभव पाहता तक्रारींचा ओघ कमी असल्याने लोकशाही दिनाचा नुसताच फार्स ठरत आहे़ शिवाय, ज्या तक्रारी येतात त्यावर त्याच लोकशाही दिनात निर्णय होत नसल्याने तक्रारींचा ओघ कमी असावा, असे काही तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे़
लोकशाही दिन महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जातो़ त्याची जनजागृती केलेली नाही़ त्यामुळे महिलांच्या तक्रारी येत नाहीत़ जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात महिला तक्रार निवारण कक्ष आहे़ या कक्षात हजारो तक्रारी येतात, मग लोकशाही दिनात का नाहीत़ माहिती नसल्याने तक्रारींचा ओघ कमी असल्याचे दिसते़

Web Title: Fashions of women's democracy day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.