‘रिचार्ज शाफ्ट’ कामाचा शेतकऱ्यांकडून पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 23:56 IST2016-05-23T23:51:47+5:302016-05-23T23:56:31+5:30

उस्मानाबाद : तालुक्यातील पाडोळी (आ़) गावच्या शिवारातील तेरणा नदीपात्रात ग्रामस्थांनी लोकसहभागातून जवळपास अर्धा कोटी रूपये खर्च करून खोलीकरण- रूंदीकरणाचे काम केले आहे़

Farmers' work of 'Recharge shaft' | ‘रिचार्ज शाफ्ट’ कामाचा शेतकऱ्यांकडून पंचनामा

‘रिचार्ज शाफ्ट’ कामाचा शेतकऱ्यांकडून पंचनामा

उस्मानाबाद : तालुक्यातील पाडोळी (आ़) गावच्या शिवारातील तेरणा नदीपात्रात ग्रामस्थांनी लोकसहभागातून जवळपास अर्धा कोटी रूपये खर्च करून खोलीकरण- रूंदीकरणाचे काम केले आहे़ मात्र, याच भागात शासकीय निधीतून कोट्यवधी रूपये खर्च करून करण्यात येत असलेली रिचार्ज शाफ्टची कामे निकृष्ठ दर्जाची होत असल्याचा प्रकार सोमवारी शेतकऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात समोर आला़ विशेषत: सर्व नियमांना फाटा देवून ही कामे उरकल्याचे यावेळी समोर आले़
मागील चार-पाच वर्षापासून निर्माण होत असलेली दुष्काळी परिस्थिती पाहता पाडोळी (आ़) परिसरातील शेतकऱ्यांनी जवळपास अर्धा कोटी रूपयांचा लोकवाटा जमा करून तेरणा नदीच्या पात्राचे खोलीकरण- रूंदीकरणाचे काम गतवर्षी केले़ लोकसहभागातून चांगली कामे झाल्यामुळे प्रशासनाने पाडोळी परिसरात जवळपास रिजार्ज शाफ्टची ११० कामे मंजूर केली आहेत़ यातील जवळपास ८० कामे पूर्ण झाली आहेत़ मात्र, ही कामे होत असतानाच निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या़ मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते़ पाडोळी येथील पोलीस पाटील धनंजय गुंड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भारत गुंड, सतीश एकंडे, बालाजी भोसले, सतीश देटे, नागनाथ काळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी सोमवारी या रिचार्ज शाफ्टचा कामाची पाहणी करून पंचनामा केला़
पंचनाम्यावेळी शेतकऱ्यांनी थेट मोजमाप करून आराखड्यानुसार काम झाले की नाही याची शहानिशा केली़ त्यावेळी बोअरची खोली, टाकण्यात येणारे मुरूम-दगड आदी व्यवस्थित न टाकणे आदी प्रकार समोर आले़ दरम्यान, दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक लाखो, कोट्यवधीचा लोकवाटा उभा करून नदी, नाले, ओढ्यांचे खोलीकरण- रूंदीकरण करीत आहेत़ मात्र, दुसरीकडे शासन निधीतून करण्यात येणारी जलसंधारणाची कामे निकृष्ठ होत असून, त्याच्या दर्जाकडे संबंधित अधिकारीही कानाडोळा करीत असल्याचा प्रकार शेतकऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यातून समोर आला आहे़

Web Title: Farmers' work of 'Recharge shaft'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.