छत्रपती संभाजीनगर: भारतीय शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि पशुपालनासह मिश्र शेती केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. ते आज, शनिवारी (दि. २३) छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्य मंदिरात ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमात पशुवैद्यक शास्त्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशनही डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक दिवाण यांनी संस्थेच्या प्रवासाची माहिती दिली. संस्थेची सुरुवात प्रतिकूल परिस्थितीत झाली असली तरी, आज अनेक सहकाऱ्यांच्या योगदानाने संस्थेची क्षमता वाढली आहे, असे ते म्हणाले.
पुरस्कार देऊन यांना केले सन्मानित यावेळी पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पशुपालक आणि पशुवैद्यकीय पदवीधरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये आदर्श पशुपालक पुरस्कार (सौ. वैशाली चव्हाण), आदर्श गोपालक (रामकृष्ण दरगुडे), आदर्श शेळीपालक (राहुल पुऱ्हे), गुणवंत विद्यार्थी (डॉ. कु. ईश्वरी जोशी), यशवंत विद्यार्थी सुवर्ण पदक (डॉ. वैभव हरडे), गुणवंत विद्यार्थिनी (डॉ. कु. शारदा ढाकरके) यांचा समावेश होता.याशिवाय, आदर्श पशुवैद्य (डॉ. अनिल कौसडीकर), पशुवैद्य भूषण (डॉ. नरेश गीते), जीवनगौरव पुरस्कार (डॉ. अरविंद मुळे), आदर्श प्राध्यापक (डॉ. प्रफुल्लकुमार पाटील), उत्कृष्ट पशुवैद्य सहदेव पुरस्कार (डॉ. आनंद दडके), उत्कृष्ट पशुवैद्य नकुल पुरस्कार (डॉ. विजय ढोके), उत्कृष्ट पशुवैद्य पुरस्कार (डॉ. प्रमोद दोशी) आणि आदर्श प्राध्यापक (डॉ. विश्वंभर पाटोदकर) यांनाही गौरवण्यात आले.
कृषी स्वयंपूर्णतेची गरजडॉ. भागवत पुढे म्हणाले, "आपल्याकडे न बोलणाऱ्या प्राण्यांचे दुःख समजून त्यांना बरे करण्याची कला आहे. शालिहोत्र या प्राचीन पशुवैद्याने घोड्याचे वय व गुणवत्तेचे शास्त्र सांगितले होते. आपली ही परंपरा अभिमानास्पद आहे. पाश्चात्त्य तंत्रज्ञान आवश्यक तेथे स्वीकारून भारतीय पद्धतीनुसार शेती आणि पशुपालनाचा समन्वय साधल्यास शेतकऱ्यांचा लाभ होईल." ते म्हणाले की, देशी गोवंश आणि पारंपरिक शेती पद्धतीवर लोकांचा विश्वास वाढत आहे. भारतीय शेतीचे आधुनिकीकरण करूनच आपण कृषी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू शकतो.