शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड शासन करणार- नायक
By Admin | Updated: May 9, 2015 00:53 IST2015-05-09T00:35:57+5:302015-05-09T00:53:10+5:30
जालना : राज्य शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील कर्जदार शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज शासनामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड शासन करणार- नायक
जालना : राज्य शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील कर्जदार शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज शासनामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावराकाराकडून कर्ज घेतले असेल त्याची माहिती संबंधित सावकाराकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित महाराष्ट्र सावकारी कर्जमाफी योजना २०१५ च्या जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांच्या आढावा बैठकीत केले.
कर्जदार व्यक्ती, पगारदार, निवृत्तीवेतनधारक, मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ नुसार परवानाधारक व्यक्ती नसावा. निव्वळ शेतकरी कर्जदारांकरीता ही योजना जाहीर झालेली असून, पात्र शेतकऱ्यांनी ७/१२ चा उतारा, कुटुंबातील अन्य व्यक्तीने कर्ज घेतले असल्यास शिधापत्रिकेची छायाप्रत, शासनमान्य छायाचित्र असलेल्या ओळखपत्राची प्रत आदी कागदपत्रे परवानाधारक सावकाराकडे दाखल करावीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संंबंधित सहायक निबंधकांना हमीपत्र देणे आवश्यक आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका सहायक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच या योजनेत पात्र ठरणाऱ्या प्रस्तावांना १५ मे पूर्वी जिल्हास्तरीय समितीने मंजुरी द्यावयाची असल्याने पात्र शेतकरी लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अशोक खरात यांनी या योजनेच्या अटी व निकषाबद्दल माहिती दिली.