पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:06 IST2021-07-14T04:06:52+5:302021-07-14T04:06:52+5:30
बाजारसावंगी : परिसरातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे यंदा पाठ फिरविली आहे. गेल्या वर्षी पीक विमा काढण्यासाठी जेवढी रक्कम ...

पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ
बाजारसावंगी : परिसरातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेकडे यंदा पाठ फिरविली आहे. गेल्या वर्षी पीक विमा काढण्यासाठी जेवढी रक्कम भरली तेवढी देखील न मिळाल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
बाजारसावंगी व परिसरातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कापूस, मका, तूर, मूग, उडीद या खरीप पिकांचा विमा काढण्यासाठी ठरावीक रक्कम भरून विमा काढला. बाजारसावंगी येथील दरेगाव, पाडळी, शेखपूरवाडी, झरी वडगाव, रेल इंदापूर, बोडखा, लोणी कनकशिळ, सुलतापूर, वडोद, येसगाव, जानेफळ, ममुराबादवाडी, शेलगाव, शिरोडी, डोंगरगाव या गावांतील शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा पीक विमा काढला होता; परंतु गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील कापूस, तूर, मका, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचा विमा तरी मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु शेतकऱ्यांच्या हाती विम्याची भरलेली रक्कम देखील भेटली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
----
गेल्या वर्षी मी कापूस, मका, तूर व सोयाबीन या खरीप पिकांचा विमा काढला होता. अतिवृष्टीसह इतर कारणांमुळे माझ्या सर्व पिकांचे नुकसान झाले. केवळ कपाशी पिकाचा अल्प रक्कम देऊन कंपनीने बोळवण केली. त्यामुळे पीक विमा भरून देखील मदत होत नसेल तर पीक विमा भरायचा तरी कशाला, असे शेतकरी भिक्कनराव घुले यांनी सांगितले.
---
यंदा विमा भरण्यासाठी १५ जुलै ही शेवटची तारीख आहे. तरी देखील शेतकरी पीक विमा भरण्याकडे वळाले नाही. यंदा शेतकऱ्यांनी पीक विमा न भरलेलाच बरा, अशी भूमिका घेतलेली दिसून येत आहे, असे सीएससी सेंटर चालक राजू शहा यांनी सांगितले.