शेतकऱ्यांनी पाडला कांद्याचा लिलाव बंद
By Admin | Updated: July 15, 2016 01:08 IST2016-07-15T00:39:04+5:302016-07-15T01:08:22+5:30
वैजापूर : कांद्याचा घसरलेला भाव व सहा टक्के अडतीमुळे गुरुवारी वैजापूर येथील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला.

शेतकऱ्यांनी पाडला कांद्याचा लिलाव बंद
वैजापूर : कांद्याचा घसरलेला भाव व सहा टक्के अडतीमुळे गुरुवारी वैजापूर येथील कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. तसेच खरीददारांकडून सहा टक्के अडत घेण्यात येत असल्याने हा कांदा कोणीच घेतला नाही. परिणामी, कांदा मार्केटमध्ये जवळपास एक हजार गोणी कांदा तसाच पडून राहिला.
वैजापूर शहरालगतच्या घायगावनजीक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये जाहीर लिलाव पद्धतीने कांदा खरेदी केली जाते. गुरुवारी मार्केटमध्ये एक हजार कांदा गोणीची आवक होती. यापूर्वी कांदा विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून सहा टक्के अडत वसूल केली जात असे; परंतु शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांऐवजी कांदा खरेदी करणाऱ्यांकडून सहा टक्के अडत वसूल करावी, असे धोरण जाहीर केले. मार्केटमध्ये लिलाव पद्धतीने जे अडत व्यापारी कांदा खरेदी करतात त्यांनी ही सहा टक्के अडत देण्यास नकार दिला. याशिवाय कांद्यासाठी कमी असलेला दर पाहून शेतकऱ्यांनीही कांदा देण्यास नकार देऊन लिलाव होऊ दिला नाही. सध्या कांद्याला सरासरी प्रति क्विंटल ९०० रुपये भाव आहे. खरीददार अडत देण्यास तयार नसल्याने अडत व्यापारीही कांद्याचा लिलाव करण्यास धजावले नाहीत. पर्यायाने गुरुवारी कांदा मार्केटमध्ये जवळपास एक हजार गोणी कांदा पडून होता.
अगोदरच कांद्याला कमी असलेला भाव व त्यात कांदा खरीददारांकडून सहा टक्के अडत वसूल करण्याचे धोरण त्यामुळे खरीददार अडत द्यायला तयार नाहीत. त्यामुळे अडत व्यापाऱ्यांचे सॅण्डविच झाल्याचे अडत व्यापारी पवन ठोंबरे व विशाल गायकवाड यांनी सांगितले. अडतीच्या विषयावर मार्ग निघेपर्यंत मार्केटमध्ये कांदा खरेदी होते की नाही, याबाबत सध्यातरी साशंकता आहे.