कालबाह्य यंत्राकडे शेतकऱ्यांची पाठ !
By Admin | Updated: December 2, 2014 00:47 IST2014-12-02T00:47:19+5:302014-12-02T00:47:19+5:30
आशपाक पठाण , लातूर कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करीत शेती उद्योगातून उपजिविका भागविणाऱ्या शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने

कालबाह्य यंत्राकडे शेतकऱ्यांची पाठ !
आशपाक पठाण , लातूर
कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करीत शेती उद्योगातून उपजिविका भागविणाऱ्या शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने विविध योजना हाती घेतल्या़ त्यापैकीच एक असलेल्या गळीत धान्य प्रकल्प योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १७४ मळणी यंत्र खरेदी करण्यात आली़ मात्र, दिवसेंदिवस अत्याधुनिक यंत्राची बाजारपेठेत स्पर्धा लागलेली असताना कृषी विभागाने कालबाह्य मळणीयंत्र खरेदी करून आपल्या अपडेट ज्ञानाची उजळणी केली आहे़ अनुदान असतानाही केवळ ५१ शेतकऱ्यांनी सदरील यंत्रे घेतली असून इतर यंत्रे आता धुळखात पडली आहेत़
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती उद्योग धोक्यात आला आहे़ कधी पाऊस पडत नाही, तर कधी पडला तर जोमात आलेल्या पिकाला भाव मिळत नाही़ अशा आसमानी व सुलतानी संकटातून मार्ग काढत शेती उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून राज्य शासनाच्या कृषी विभागाने गळीत धान्य प्रकल्प योजनेंतर्गत मार्च २०१४ मध्ये मळणीयंत्र खरेदी केली़ ज्वारी, गहू, बाजरी, हरभरा, सोयाबीन, गहू, तूर आदी पिकांची रास करण्याच्या पध्दतीत दरवर्षी नवनवीन बदल होत आहेत़
कृषी क्षेत्रात आलेल्या अत्याधुनिक तंत्रामुळे पिकांची रास करणे शेतकऱ्यांना आता सुलभ होत आहे़ पिके काढणीला आली की शेतात नव्या तंत्रज्ञानावरील मशीनद्वारे काही तासांतच घरात रास येऊ लागली आहे. वाढत्या बदलाचे ज्ञान असतानाही महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाने कालबाह्य होत चाललेल्या मळणीयंत्राची खरेदी का केली? हा प्रश्न अनुत्तरीत आहे़ लातूर जिल्ह्यात मार्च २०१४ मध्ये १७४ मळणीयंत्र आले़ इतर साहित्यांप्रमाणे मळणीयंत्राची मागणी लक्षात घेऊन जि़प़सदस्यांची शिफारस स्थानिक स्तरावर अनिवार्य करण्यात आली़ शेतकरी घेऊन जात नसल्याचे लक्षात आल्यावर ही अट रद्द झाली़ अधिकाऱ्यांनी गावपुढाऱ्यांना सांगितले तरीही कालबाह्य यंत्राला प्रतिसाद मिळत नसल्याने आता कृषी विभाग सदरील मळणीयंत्र बदलणार की तसेच कुजवित ठेवणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ आधुनिक शेतीचे धडे देणारा कृषी विभाग इतिहासातच जात आहे़ ४
५० हजार ९७५ रूपये मूळ किंमत असलेले हे मळणीयंत्र १५ हजारांच्या अनुदानावर शेतकऱ्यांना ३५ हजार ९७५ रूपयांना देण्यात येत आहेत़ खरिपात सोयाबीनचा पेरा अधिक असतानाही केवळ ५१ शेतकऱ्यांनी अनुदानावरील मळणीयंत्र घेतले आहे़ बाजारात आधुनिक मळणीयंत्राची किंमत ६० हजारांपुढे आहे़ जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने १७४ मळणीयंत्राच्या वाटपाची जबाबदारी पंचायत समिती स्तरावर दिली होती़ त्यापैकी लातूर पंचायत समितीला २४ मळणीयंत्र आली आहेत़ यातील १० यंत्र शेतकरी घेऊन गेले असून उर्वरित १४ यंत्र गोदामात धूळखात पडले आहेत़ अशीच परिस्थिती इतर तालुक्यांत असल्याचे सांगण्यात आले़
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मोहन भिसे म्हणाले, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाकडूनच मळणीयंत्राची दर निश्चिती होते़ तसेच कुठल्या प्रकारचे यंत्र खरेदी करावयाचे हे महामंडळच ठरविते़ ज्या पध्दतीने आरसी झाली त्याचप्रमाणे खरेदी केली जाते़ बाजारात अत्याधुनिक प्रकारची यंत्रे असल्याने कदाचित शेतऱ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही़ यावर्षी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असावी़ तरीही सध्या शिल्लक असलेली मळणीयंत्रे बदलून मिळतील का, याबाबत पाठपुरावा करण्यात येईल़