शेतकऱ्यांनी तूर खरेदी पाडली बंद
By Admin | Updated: March 6, 2017 00:52 IST2017-03-06T00:51:28+5:302017-03-06T00:52:15+5:30
उमरगा : नियमाप्रमाणे ३० रुपये हमाली असताना शेतकऱ्यांकडून १०० रुपयाप्रमाणे हमालीचे पैसे मागितल्यावरून शेतकऱ्यांनी तब्बल चार तास तुरीची खरेदी बंद पाडून संबंधितांना चांगलेच धारेवर धरले.

शेतकऱ्यांनी तूर खरेदी पाडली बंद
उमरगा : नियमाप्रमाणे ३० रुपये हमाली असताना शेतकऱ्यांकडून १०० रुपयाप्रमाणे हमालीचे पैसे मागितल्यावरून शेतकऱ्यांनी तब्बल चार तास तुरीची खरेदी बंद पाडून संबंधितांना चांगलेच धारेवर धरले. हा प्रकार येथील बाजार समिती आवारातील हमी भाव तूर खरेदी केंद्रावर रविवारी घडला. त्यामुळे बाजार समिती कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. दरम्यान, आजपर्यंत येथे २८ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली असून, याचे ७० रुपयाप्रमाणे जादा घेतलेले १९ लाख ६० हजार रुपये नेमके कोणाच्या खिशात गेले, असा प्रश्नही यानिमित्ताने पुढे येत आहे.
केंद्र शासनाच्या आधारभूत खरेदी किंमत योजनेंतर्गत भारतीय खाद्य निगमच्या वतीने दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन लि. च्या वतीने माडज येथील विविध कार्यकारी सोसायटीमार्फत उमरगा बाजार समितीमध्ये १७ डिसेंबरपासून प्रतिक्विंटल ५०५० रुपये दराने तूर खरेदी सुरु करण्यात आली आहे. मागील तीन वर्ष पडलेल्या भीषण दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. मात्र, मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने तुरीचे उत्पन्न वाढले आहे. नोटबंदीमुळे शेतीच्या मालाच्या दरात मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने निसर्गाच्या साथीने शेतीमाल निघाला. परंतु, उत्पादनासाठी आलेल्या खर्चाइतकाही दर मिळत नसल्याने शोतकरी अडचणीत सापडला आहे. यावर उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने प्रतिक्विंटल ५०५० रुपये हमीदर देवून तूर खरेदी सुरु केली. वेळोवेळी बारदान्याची कमतरता, जागेची अडचण यासह विविध अडथळ्याची शर्यत पार करत येथे खरेदी सुरू आहे. काढणीचे पैसे, सावकारांचे देणे द्यायचे असल्याने शेतकऱ्यांना तातडीने पैशांची गरज आहे. त्यामुळे मार्केट कमिटीने यार्डातील व्यापाऱ्यांना चाळणी व काटा करुन देण्याचा निर्णय घेतला. आजरोजी मार्केट यार्डच्या परिसरात जवळपास ८ हजार पोते तूर उघड्यावर पडली आहे.
असे असतानाच रविवारी दुपारी मळगी येथील शेतकरी कमलाकर आळंगे यांच्या ११० गुंठे तुरीचे वजन केल्यानंतर मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्याने त्यांना प्रतिक्विंटल शंभर रुपयेप्रमाणे हमाली मागितली. संबंधित शेतकऱ्यांनी मी नियमाप्रमाणे ३० रुपयेप्रमाणे हमाली देण्यास तयार असून, जास्तीचे पैसे कशासाठी अशी विचारणा केली. परंतु कमी पैसे घेण्यास कर्मचारी तयार नव्हता. यावरूनच शाब्दीक चकमक सुरू झाली. यावेळी इतर शेतकरीही येथे जमा झाले. हा प्रकार समोर आल्यानंतर शेतकरञयांनी हमालीच्या नावाखाली होणारी लूट बंद करावी, अशी मागणी मार्केट कमिटीकडे केली. यावेळी संचालक एम.ए. सुलतान यांनी याबाबत संबंधिताना जाब विचारला. यावेळी मार्केट कमिटीचे सभापती नानाराव भोसले, सचिन सिद्धप्पा घोडके, गुणनियंत्रक काही शेतकरी यांच्या शाब्दीक चकमकी उडाल्या. या जादा रकमेबाबत कोणतेही कारण सभापती अथवा सचिवांकडून मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी जवळपास चार तास खरेदी बंद पाडली होती. (वार्ताहर)