जिल्हा बँक शाखेला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे
By Admin | Updated: April 18, 2017 00:06 IST2017-04-18T00:03:51+5:302017-04-18T00:06:38+5:30
शिराढोण :स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी जिल्हा बँकेच्या येथील शाखेला सोमवारी टाळे ठोकले.

जिल्हा बँक शाखेला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे
शिराढोण : रबी हंगामातील पीकविम्यातून परस्पर कपात केलेले थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे पैसे परत मिळावेत, या मागणीसाठी शिराढोण येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी जिल्हा बँकेच्या येथील शाखेला सोमवारी टाळे ठोकले.
यासंदर्भात संघटनेच्या वतीने १० एप्रिल रोजी बँक प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी संघटनेचे पदाधिकारी बँकेत आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे कपात करणार नसल्याबाबत लेखी देण्याची मागणी बँक कर्मचाऱ्यांकडे केली. परंतु, बँकेत जिल्हास्तरावरील कुठलेही अधिकारी किंवा पदाधिकारी हजर नसल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी गायकवाड यांनी आम्हाला असे लेखी देता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर भ्रमणध्वनीद्वारे जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक यांच्याशी संपर्क साधला. मात्र, यावरही संघटनेचे समाधान झाले नाही. त्यामुळे तालुकाध्यक्ष विष्णू काळे यांच्या नेतृत्वाखाली बँकेतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून बँकेला टाळे लावण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजय शिंदे, सरचिटणीस नामदेव माकोडे, सचिव राजपाल देशमुख, शाम मस्के, मोहन ठोंबरे, संजय शेळके, शाम पाटील, भैरु माकोडे आदी शेतकरी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिराढोण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजीवन मिरकले यांनी त्यांचा फौजफाटा तैनात केला होता. (वार्ताहर)