तहसीलदारांना शेतकऱ्यांचा घेराव
By Admin | Updated: June 27, 2014 01:04 IST2014-06-27T00:54:21+5:302014-06-27T01:04:44+5:30
औरंगाबाद : गारपिटीमुळे नुकसान होऊनही अद्याप शासकीय आर्थिक मदत मिळाली नसल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील काही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारी तहसील कार्यालयात येऊन तहसीलदारांना घेराव घातला.

तहसीलदारांना शेतकऱ्यांचा घेराव
औरंगाबाद : गारपिटीमुळे नुकसान होऊनही अद्याप शासकीय आर्थिक मदत मिळाली नसल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील काही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारी तहसील कार्यालयात येऊन तहसीलदारांना घेराव घातला. तहसीलदारांनी सोमवारपर्यंत बँक खात्यात मदत जमा करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही आंदोलकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी तहसीलदारांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. तासाभरानंतर पोलिसांनी या सर्व आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात
घेतले.
मोसंबी उत्पादक शेतकरी संघाचे जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पन्नासहून अधिक शेतकरी दुपारी १२ वाजता तहसीलमध्ये दाखल झाले. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे शासनाची आर्थिक मदत वाटप करण्यात आली.
बहुसंख्य गावांना ही मदत मिळाली. मात्र, पिंप्रीराजा, गारखेडा, एकोड, पाचोड, आप्तगाव, लायगाव यासह तालुक्यातील ४२ गावांतील शेतकऱ्यांना नुकसान होऊनही मदत मिळालेली नाही, असे का? असा जाब विचारून आंदोलक शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घातला. हा घेराव सुमारे अर्धा तास कायम होता. अधूनमधून घोषणाबाजीही सुरू होती. गारपीटग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे, दादा बाबांचा धिक्कार असो, शेतकरीविरोधी प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.
त्यानंतर तहसीलदारांनी शासनाकडून लवकरच काही निधी मिळणार आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही.
त्यांनी लगेच तहसीलदारांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. अर्धा तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर अखेर सिटीचौक पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात विलास चव्हाण, गणपत घोडके, हनुमान मदगे, संदीप घोडके, सोमनाथ घोडके, रावसाहेब शिंदे, यशवंत घोडगे, मनोहर झिंजुर्डे, सुनील राठोड, कृष्णा पवार, एकनाथ घोडके आदी सहभागी झाले.
(लोकमत ब्युरो)
सोमवारपर्यंत मदत खात्यावर जमा होईल
शासनाकडून आणखी काही निधी लवकरच मिळणार आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत या गावातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातील. तत्पूर्वी, शनिवारपर्यंत सर्व गावांमध्ये लाभार्थ्यांच्या याद्या डकविण्यात येतील, असे तहसीलदार विजय राऊत यांनी सांगितले.