शेतकऱ्यांनी शोधली स्वत:ची वाट़़़!
By Admin | Updated: July 23, 2014 00:32 IST2014-07-22T23:59:46+5:302014-07-23T00:32:14+5:30
वलांडी : एरव्ही निवडणुकीच्या काळात आश्वासनांची खैरात करणाऱ्या लोेकप्रतिनिधींकडे चकरा मारूनही कुठलाच निधी उपलब्ध होत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी स्वखर्चातून नाल्यावरील पुलाचे काम सुरू केले

शेतकऱ्यांनी शोधली स्वत:ची वाट़़़!
वलांडी : एरव्ही निवडणुकीच्या काळात आश्वासनांची खैरात करणाऱ्या लोेकप्रतिनिधींकडे चकरा मारूनही कुठलाच निधी उपलब्ध होत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी स्वखर्चातून नाल्यावरील पुलाचे काम सुरू केले असून ते प्रगतीपथावर आहे़ या पुलासाठी अंदाजित चार लक्ष रूपये खर्च अपेक्षित असल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
स्वातंत्र्यपूर्व काळापासून धनेगांव - टाकळी ही पाऊलवाट आहे़ या पाऊलवाटेवर एक मोठा नाला आहे़ या नाल्यापलीकडे धनेगांवकराच्या जमिनी आहेत़ तर टाकळी गावचे चिमुकले ज्ञानार्जनासाठी धनेगाव येथे येतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत या नाल्यातून मार्ग काढणे जिकरीचे ठरते़ वेळोवेळी शेतकरी व विद्यार्थ्यांनी मागणी करूनही कोणीही या घटनेकडे गांभिर्याने पाहिले नाही़ यातच शेतकऱ्यांनी आता आपली वाट आपणच शोधावी यासाठी पूल बांधण्याचा मानस केला अन् त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली़ केवळ आठ जणांनी लोकवर्गणी करून ४० फूट लांब, ९ फूट उंच व ८ फूट रूंदीच्या पुलाच्या पिलरचे काम पूर्ण केले आहे़ आता निधी संपल्याने स्लॅबचे काम रखडले आहे़
उर्वरित कामासाठी कोणी दानशूर मिळेल का? कुठल्या तरी योजनेत बसवून हे काम पूर्ण होईल का? शेतकऱ्यांचे ओझे कोणीतरी कमी करेल का? असा प्रश्न पुढाऱ्यांना व प्रशासनाला विचारला तर गैर ठरणार नाही़(वार्ताहर)
माजी सैनिकांचा पुढाकार
याकामी शिवाजी बिरादार, रावसाहेब खारे, अभिमन्यू खारे या तीन माजी सैनिकांनी प्रभाकर बिरादार, लक्ष्मण बोराळे, अशोक अवलकोंडे, सुरेश बिरादार यांना सोबत घेऊन पूल उभारण्याचा सेतू बांधला़ प़ंस़सदस्य तुकाराम पाटील, सरपंच संघटनेचे कुमार पाटील, व अनंत पाटील यांनीही याकामी चांगले योगदान दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले़