शेततळ्यांचे प्रस्ताव पाच हजारांवर
By Admin | Updated: March 20, 2016 00:50 IST2016-03-20T00:26:02+5:302016-03-20T00:50:38+5:30
राजेश खराडे , बीड मागेल त्याला शेततळे या योजनेचा मोठा गाजावाजा झाला असल्याने शेतकऱ्यांना त्याबाबत योग्य ती माहिती मिळाली आहे.

शेततळ्यांचे प्रस्ताव पाच हजारांवर
राजेश खराडे , बीड
मागेल त्याला शेततळे या योजनेचा मोठा गाजावाजा झाला असल्याने शेतकऱ्यांना त्याबाबत योग्य ती माहिती मिळाली आहे. अनुदान रक्कम कमी असली तरी दिवसेंदिवस प्रस्तावांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यापपर्यंत ५,२९८ प्रस्तावांची नोंदणी झाली आहे, तर प्रत्यक्षात आॅनलाईनद्वारे ४ हजार ७०९ प्रस्ताव जिल्ह्यातून येथून कृषी अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आहेत.
आॅनलाईनद्वारे प्रस्तावाचा २० दिवसांचा कालावधी लोटला असून, दरम्यान ४ हजार ७०९ शेतकऱ्यांनी ७/१२, ८-अ व इतर कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव दाखल केले आहेत. जिल्ह्याकरिता २ हजार ४८० शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे.
दुष्काळाची दाहकता आणि पाणी साठवणुकीचे महत्त्व कळाल्यामुळे शेतकरीही शेततळ्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत. या योजनेचा तळागाळातील शेतकऱ्यांना लाभ घ्यावा, याकरिता शेतकऱ्यांच्या बैठका, बॅनरबाजी, तसेच कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन त्यांना शेततळ्याचे महत्त्व पटवून देणे अनिवार्य होते; मात्र येथील कृषी अधिकारी उदासीन असून, केवळ शेतकऱ्यांच्या उत्साहामुळे लाभार्थींची संख्या वाढत आहे.
दुर्दैव म्हणजे तंत्र विभागातील अधिकाऱ्यांना जिल्ह्यातून किती प्रस्ताव दाखल झाले, तालुकानिहाय शेततळ्यांची अवस्था काय, याची माहितीदेखील उपलब्ध नाही.
मागेल त्याला शेततळे या महत्त्वपूर्ण योजनेकडे अधिकाऱ्यांने असे दुर्लक्ष केले तर शेतकऱ्यांचाही उत्साह मावळणार आहे. योग्य ती माहितीही शेतकऱ्यांना दिली जात नाही. शेतकऱ्यांची अवस्था आणि दुष्काळाची दाहकता यांचे सोयरसूतक नसल्यासारखे तंत्र विभागातील अधिकारी वागत आहेत.