शेतकऱ्यांची मालमत्ता उघड्यावर
By Admin | Updated: May 16, 2016 23:50 IST2016-05-16T23:46:06+5:302016-05-16T23:50:43+5:30
उस्मानाबाद : बंद पडलेल्या ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात कारखान्याची म्हणजेच शेतकरी सभासदांची कोट्यवधीची मालमत्ता पडून आहे.

शेतकऱ्यांची मालमत्ता उघड्यावर
तेरणा साखर कारखाना : पदभार घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप
उस्मानाबाद : बंद पडलेल्या ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात कारखान्याची म्हणजेच शेतकरी सभासदांची कोट्यवधीची मालमत्ता पडून आहे. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही जिल्हा उपनिबंधक तथा कारखान्याच्या प्रशासकांनी पदभार घेतलेला नाही. या प्रकाराबाबत ढोकी परिसरातील शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांची मालमत्ता सहीसलामत ठेवण्यासाठी प्रशासकांनी तात्काळ पदभार स्वीकारावा, अशी आग्रही मागणी जोर धरत आहे.
थकित ऊस बिल अदा न करणे, संचालक मंडळाने गाळप क्षमतेचा पूर्ण वापर न करणे, गाळपास परवाना घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही न करणे यासह इतर कारणावरून तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या या निर्णयाविरुद्ध संचालकांनी अपिल दाखल केले होते. सुनावणी अंती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अपिल नामंजूर करीत प्रादेशिक सहसंचालकांचा निर्णय कायम ठेवत, तेरणा कारखान्याच्या प्रशासकपदी जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्ती जाहीर होऊन एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही बडे यांनी कारखान्याचा पदभार स्वीकारलेला नाही.
एकेकाळी मराठवाड्यातील सर्वात मोठा साखर कारखाना अशी ओळख असलेली ही संस्था आज बंद पडल्याने शेकडो कर्मचाऱ्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. कारखाना बंद पडल्याने तसेच मागील अनेक दिवसापासून कारखान्यामध्ये सुरक्षा कर्मचारी नसल्याने परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे.
विशेष म्हणजे कारखान्याचा वीजपुरवठाही सध्या बंद आहे. त्यामुळे उपनिबंधक बडे यांनी कारखान्याचा पदभार तातडीने स्वीकारावा, अशी मागणी सभासद शेतकऱ्यांतून होत आहे. याबाबत तेथील शेतकरी अब्दुलबारी काझी, बबनराव कावळे, झुंबर बोडके, सय्यद जावेद, विलास रसाळ, संजय घनगावे, राजीव रसाळ आदींनी जिल्हा उपनिबंधकांकडे तातडीने पदभार स्वीकारण्याची विनंती केली आहे. सद्यस्थितीत कारखान्याच्या शेतकरी सभासद व कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सुरक्षा कर्मचारी नसल्याने कारखान्यातील अनेक मौल्यवान वस्तू उघड्यावर आहेत. सदर वस्तूंची चोरी झाल्यास शेतकरी सभासदांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी आणि राहिलेली मालमत्ता सहीसलामत ठेवण्यासाठी कारखान्याचा पदभार घ्या, अशी विनंती या शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक बडे यांच्याकडे चार दिवसापूर्वी केली आहे. मात्र त्यानंतरही कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.