बोंडअळीच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हाती केवळ ४० टक्के कापूस पडला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागले. सुरुवातीपासूनच अवकाळी पावसामुळे कापसाला चांगलाच फटका बसला. तरीही शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा होती. मात्र, बोंडअळीने शेतकऱ्यांना हैराण केले.
एकरी १० ते १२ क्विंटल कापूस पिकत होता तेथे केवळ ३ ते ४ क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या हाती पडला. लागवडीचा खर्चदेखील निघणे कठीण झाले. काही ठिकाणी शेतात कापसाचे पीक अद्यापही आहे. मात्र, त्यांच्या शेतात बोंडअळीने उद्रेक केल्याने शेतकरी कापूस चिमट्याने उपटून शेतातच पेटवून देत आहेत. त्या ठिकाणी गव्हाची पेरणी करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. प्रशासनाने पाहणी करून बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.