पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड
By Admin | Updated: August 1, 2014 01:04 IST2014-08-01T00:39:59+5:302014-08-01T01:04:52+5:30
परळी/मांडवा: तालुका परिसरात पाऊस समाधानकारक नसल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. दोन मोठ्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या.
पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड
परळी/मांडवा: तालुका परिसरात पाऊस समाधानकारक नसल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. दोन मोठ्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. आता पावसाने पुन्हा दडी मारली असल्यामुळे शेतकरी पीक विमा भरण्यासाठी सरसावले असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये सकाळी ९ वाजेपासूनच गर्दी होत आहे.
पीक विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. त्यामुळे गुरुवारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकेसमोर सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. गेल्या तीन दिवसांपासून असेच चित्र पहावयास मिळत आहे. बँकेसह तलाठी कार्यालयातही तोबा गर्दी झाली आहे. सातबारा वेळेवर मिळत नसल्याने सकाळपासून शेतकरी तेथे जाऊन थांबले होते. सातबारा मिळाल्यानंतर पुन्हा बँकेच्या दारात जाऊन थांबले होते. पूर्वी पीक विम्याकडे अनेकांनी कानाडोळा केला होता. मात्र आता पाऊस बेभरवशाचा झाला असल्यामुळे शेतकरी पीक विमा भरण्यास प्राधान्य देत आहेत. दरम्यान, ७ जून रोजी सुरु होणारा पाऊस ७ जुलैपासून सुरू झाला होता. त्यानंतरच्या कालावधीत तालुका परिसरात केवळ दोन ते तीन मोठे पाऊस झाले आहेत. या पावसावरच शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या उरकल्या होत्या. पिके उगवली असताच पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांना अक्षरश: बकेटीत पाणी नेऊन उगवलेल्या पिकांना तांब्याने पाणी टाकले. पिकांना जगविणे हेच त्यांचे ध्येय बनले आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी आता चिंतित झाले आहेत. पाऊस जर पडला नाही तर उगवलेली पिके पुन्हा पाण्याअभावी सुकून जातील. शेतकऱ्यांनी मोठ्या मुश्किलीने पैसे गोळा करुन पेरण्या केल्या होत्या. आता पावसाने धोका दिला असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे आता प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच तर पीकविमा भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठी गर्दी दिसून येत आहे. गुरुवारी पीकविमा भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे बँकेत शेतकऱ्यांनी तोबा गर्दी केली होती. त्यामुळे तालुक्यातील किती शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे, याची माहिती रात्रीपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. (वार्ताहर)