कायगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिसरातील जुने कायगाव, नवीन कायगाव, अंमळनेर, लखमापूर, गणेशवाडी, भेंडाळा, गळनिंब, अगरवाडगाव, भिवधानोरा आणि धनगरपट्टी शिवारात यंदा मुसळधार पाऊस झाला. या पावसाने कापूस, सोयाबीन, तूर, मूग, भुईमूग, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. अगरवाडगाव, भिवधानोरा, गळनिंब, धनगरपट्टी या शिवारातील सोयाबीन आणि तुरीच्या पिकाचेसुद्धा शंभर टक्के नुकसान झाले. तसेच तुरीचे पीक, भुईमूग आणि मूग या पिकांचेही नुकसान झाले. यंदा या पिकाला बहरही आला नाही.
भेंडाळा शिवारातील ज्या शेतकऱ्यांनी मका पिकाची पेरणी केली होती, त्यांनाही तोच अनुभव आला. अतिपावसाने मक्याची वाढ खुंटली. शासनाने नुकसानभरपाईबाबत पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर तहसील प्रशासनाने पिकांची पाहणी सुरु केली. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्षात भेटी देऊन नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा केला. आता या प्रक्रियेला सुद्धा दोन महिन्यांहून जास्त काळ लोटला गेला. प्रतिहेक्टरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई दोन हेक्टरच्या मर्यादेत देणार असल्याचे जाहीर केलेले आहे. मात्र, आता या प्रक्रियेला खूपच उशीर होत आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. भेंडाळा महसूल मंडळातील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत येणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाई जमा झाली आहे, मात्र त्यांची संख्या कमी आहे. प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कायगाव भागातील शेतकऱ्यांतून केली जात आहे.