जिल्ह्यातील शेतकरी चिंतातुर
By Admin | Updated: August 7, 2014 23:36 IST2014-08-07T01:03:38+5:302014-08-07T23:36:13+5:30
जालना : जिल्ह्यात आतापर्यंत जोरदार पाऊस पडला नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली

जिल्ह्यातील शेतकरी चिंतातुर
जालना : जिल्ह्यात आतापर्यंत जोरदार पाऊस पडला नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र, तीही वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी रिमझीम पाऊस पडत असल्याने त्यावरच शेतकरी समाधान मानून मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात कमी म्हणजे केवळ १७ टक्के पाऊस झालेला आहे. यावर्षी आतापर्यंत ३४ टक्के पावसाची अपेक्षा होती. मात्र अपेक्षापेक्षा ५० टक्के कमी पाऊस झाल्याने शेतकरी चिंतातुर झालेला आहे. दुष्काळाचे सावट नेर: जालना तालुक्यातील नेर परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही पाण्याअभावी पिके आली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिसरातील नेर, टाकरवन, मोहाडी, शिवणी, हिवर्डी, हस्तपोखरी परिसरात शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. ज्या शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीनची लागवड केली. ते पावसाअभावी चिंतातूर झालेले आहे. बियाणे व औषधीवर केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून चारापाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेवून उपाययोजना कराव्यात व जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी रामेश्वर बजाज, रमेशराव गाते, नितीन तोटेवार, भागवतराव उफाड आदी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)शेवगा : अंबड तालुक्यातील धनगर पिंप्री परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयोग करण्यात आला. यावेळी भट्टीत विविध वनस्पतीचे लाकडे जमा करून एकत्र करून त्यात मीठ टाकून अग्नि देवून पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात आला. ४सलग दोन महिन्यापासून दांडी मारलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. पाऊस पडावा यासाठी वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी पिंप्रीवासियांनी एकत्र येवून हा प्रयोग यशस्वी पार पाडला. वड, पिंपळ, लिंब, चंदन, बाभुळ अशा विविध वृक्षांची लाकडे जमा करून मोठा यज्ञ येथे पार पडला. यावेळी नानासाहेब शेळके, विलास कचरे, परमेश्वर जाधव, रामेश्वर सावंत, शिवाजी अरगडे, महेंद्र जाधव, बंडू काळे, श्रीराम अनपट, रामेश्वर जाधव, बाळू नरोडे, कृष्णा वरे, बाळू नरोडे, रामेश्वर मोठकर, ज्ञानेश्वर कदम आदींसह ग्रामस्थांनी पावसासाठी साकडे घातले. शेवगा- अंबड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने तालुक्यावर दुष्काळाची छाया पसरली आहे. परिसरातील अनेक गावात पावसाळ्यात ही हिरवा चारा मिळेनासा झाला आहे. यावर्षी निम्मा पावसाळा संपत आला तरी अद्यापपर्यंत जोरदार पाऊस पडलेला नाही.त्यामुळे ग्रामस्थांना पशुधनासाठी हिरवा चारा मिळत नाही. बाहेरून चारा खरेदी करून आनावा लागत आहे. पावसाअभावी जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या परिसरात चारा छावनी सुरू करावी अशी मागणी डॉ. अंकुश काकडे, मच्छिद्र नागरे, परमेश्वर जाधव, विठ्ठल धुपे, भास्कर शेरे विलास कचरे, भानुदास तिळेकर, श्याम तिकांडे आदींनी केली आहे.