शेतकऱ्याची मुलगी राज्यात पहिली
By Admin | Updated: March 10, 2017 00:17 IST2017-03-10T00:14:32+5:302017-03-10T00:17:53+5:30
सिरसाळा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील वरखेलसारख्या खेडेगावातील शेतकऱ्याची मुलगी माधुरी शामसुंदर सोन्नर आता कर सहायक म्हणून ओळखली जाणार आहे.

शेतकऱ्याची मुलगी राज्यात पहिली
ग्ाणेश देशमुख सिरसाळा
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील वरखेलसारख्या खेडेगावातील शेतकऱ्याची मुलगी माधुरी शामसुंदर सोन्नर आता कर सहायक म्हणून ओळखली जाणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एनटीसी प्रवर्गातून राज्यात पहिली येण्याचा मान माधुरीने पटकावला आहे.
वरखेल हे परळी तालुक्यातील सिरसाळ्यापासून जवळच असलेले अवघ्या ३०० उंबरठ्याचे गाव. आई-वडीलांचा व्यवसाय शेत. वडील शामसुंदर यांच्याकडे कोरडवाहू शेती आहे. या शेतीवर कुटुंबाची उपजीविका चालत नसल्याने त्यांनी गाव सोडून मुंबई गाठली. माधुरीच्या आईने मग शेतीकडे लक्ष दिले. वडिलांनी मुंबईत काम करून माधुरीसह एका मुलीचे व मुलाचे शिक्षण पूर्ण केले. मुलीला वकिलीचे शिक्षण दिले, तर मुलगा इंजिनिअरिंग करतोय.
वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन शिकविले, याची माधुरीला जाणीव होती. तिनेही रात्रंदिवस कष्ट करून अभ्यास केला. याच अभ्यासाच्या जोरावर तिने राज्य सेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कर सहायक परीक्षेत यश संपादन करून आई-वडिलांसोबतच जिल्ह्याचीही मान उंचावली.
महिला दिनाच्या दिवशीच ही शुभवार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली अन् तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.