बाजार समितीत शेतकऱ्यांचा गोंधळ
By Admin | Updated: August 1, 2014 00:30 IST2014-07-31T23:49:40+5:302014-08-01T00:30:38+5:30
हिंगोली : व्यापाऱ्यांच्या सवडीप्रमाणे होणाऱ्या लिलावाची समस्या अद्यापही सुटलेली नाही. परिणामी, दोन दिवसांपासून लिलावाची वाट पाहणाऱ्या उत्पादकांचा गुरूवारी संयम सुटला.

बाजार समितीत शेतकऱ्यांचा गोंधळ
हिंगोली : व्यापाऱ्यांच्या सवडीप्रमाणे होणाऱ्या लिलावाची समस्या अद्यापही सुटलेली नाही. परिणामी, दोन दिवसांपासून लिलावाची वाट पाहणाऱ्या उत्पादकांचा गुरूवारी संयम सुटला. जवळपास पन्नास शेतकऱ्यांनी बाजार समितीत गोंधळ सुरू केला. तातडीने शहर ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेवून शेतकऱ्यांना शांत केले.
काही उत्पादक दोन तर काही कालपासून लिलावाच्या प्रतीक्षेत होते. बुधवारी दिवसभर लिलाव झाला नाही. दरम्यान दुपारी आलेल्या पावसात बहुतांश उत्पादकांचा माल भिजला. गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत लिलावास सुरूवात झाली नव्हती. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाची चिन्हे दिसू लागल्याने उत्पादक संतापले. आजही माल भिजण्याची शक्यता असल्यामुळे पन्नास शेतकऱ्यांनी बाजार समितीत धाव घेतली. तेथे सचिव नसल्याने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. महिती मिळताच शहर ठाण्याची गाडी दाखल होताच शेतकरी शांत झाले. नंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केली. (प्रतिनिधी)
पुन्हा तोच प्रकार
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी व व्यापाऱ्यांत शेडमध्ये माल ठेवण्यावरून संघर्ष सुरू आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल लवकर उचलला जात नाही. तर शेतकऱ्यांनी आणलेला माल ठेवण्यास जागाही नाही. बीट वेळेवर होत नाही. बाजार समितीही या प्रश्नाचे भिजत घोंगडे ठेवून उघड्या डोळ्यांनी पाहात आहे.