शेतकऱ्याने केले स्वखर्चातून बंधाऱ्याचे काम

By Admin | Updated: July 9, 2014 00:34 IST2014-07-08T22:55:29+5:302014-07-09T00:34:31+5:30

गणेश लोंढे, राणी उंचेगाव पाण्याचे महत्त्व कळले अन् या जाणिवेतून भविष्यकाळात अशा समस्यांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधून वाहणाऱ्या नाल्यावर सिमेंट बंधाऱ्याचे काम हाती घेतले आहे.

Farmer's Bonding Work | शेतकऱ्याने केले स्वखर्चातून बंधाऱ्याचे काम

शेतकऱ्याने केले स्वखर्चातून बंधाऱ्याचे काम

गणेश लोंढे, राणी उंचेगाव
दुष्काळी परिस्थितीची भयानक दाहकता अनुभवल्यानंतर पाण्याचे महत्त्व कळले अन् या जाणिवेतून भविष्यकाळात अशा समस्यांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधून वाहणाऱ्या नाल्यावर सिमेंट बंधाऱ्याचे काम हाती घेतले आहे.
घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील फळबागधारक शेतकरी रामेश्वर शिवतारे यांच्या गटक्रमांक ९९ या क्षेत्रामधून नाला गेलेला आहे.
या नाल्याची जेसीबी यंत्राच्या साह्याने दोन्ही बाजूने रूंदी, खोली आणि उंची योग्य प्रकारे करून या नालयावर सिमेंट बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या नाल्यावर १२० मीटर लांब, ५ मीटर उंच आणि ६ मीटर रूंद या आकाराचा सिमेंट बंधारा तयार करण्याचे काम शासनाच्या कोणत्याही योजनेची आशा न बाळगता सुरू केले आहे.
मागील वर्षी पडलेल्या भयंकर दुष्काळी परिस्थितीत पाण्याअभावी फळबागा जळाल्या होत्या. या परिस्थितीमध्ये शिवतारे यांची देखील दोन हेक्टरवरील मोसंबीची बाग पाण्याअभावी तोडून फेकावी लागली होती. या दुष्काळी परिस्थितीचा अनुभव आल्यानंतर शेतामधील नाल्यावर सिमेंट बंधाऱ्याचे काम हाती घेऊन भविष्यामध्ये सिंचनाची एक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे.या सिमेंट बंधाऱ्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढण्याचे काम नक्कीच होणार आहे. त्याचबरोबर कापूस, गहू, ज्वारी, हरभरा अशा पिकांच्या क्षेत्रामध्ये देखील वाढ होणार आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून अशा प्रकारचे नाले, ओढे गेलेली असतील अशा शेतकऱ्यांनी सिंचनाच्या सुविधेसाठी आणि जमिनीमधील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या सिमेंट बंधाऱ्याची, माती बंधाऱ्याची उपाययोजना कराव्यात, असे शिवतारे यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
कृषी विभाग
गाढ झोपेत
शेतकरी दुष्काळी परिस्थितीमध्ये होरपळतात आणि सावरतात परंतु शेतकऱ्यांच्या खऱ्या परिस्थितीकडे लक्ष देण्याची मानसिकता कृषी विभागाची राहिलेली नाही. सिमेंट बंधारे, माती बंधारे, साखळी सिमेंट बंधारे अशी सिंचनाची महत्त्वाची कामे गतिमान झालेली नाही. यामुळेच शेतकऱ्यांना अनेक समस्येला तोंड देवून प्रसंगी कर्जबाजारी होऊन शेतीच्या सिंचनाच्या सुविधा स्वखर्चातून हाती घेण्याची वेळ आली आहे.

Web Title: Farmer's Bonding Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.