जनावरांमधील लाळ खुरकतमुळे शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:02 IST2021-04-10T04:02:16+5:302021-04-10T04:02:16+5:30
अंधारी : सिल्लोड तालुक्यातील अंधारी परिसरात लोणवाडी, टाकळी, म्हसला बुद्रुक व अन्य गावांमधील जनावरांमध्ये लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भाव झाला ...

जनावरांमधील लाळ खुरकतमुळे शेतकरी अडचणीत
अंधारी : सिल्लोड तालुक्यातील अंधारी परिसरात लोणवाडी, टाकळी, म्हसला बुद्रुक व अन्य गावांमधील जनावरांमध्ये लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेष म्हणजे लस देऊनही लाळ्या खुरकत रोग पसरत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या आजाराने विविध शेतकऱ्यांची तेरा जनावरे दगावल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अंधारी परिसरातील अनेक गावांत जनावरांमध्ये लाळ खुरकुत आजार जडत असून, जनावरे दगावत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आजार जडला तर जनावरांना खूप ताप येऊन ते चारापाणी खात-पित नाहीत. परिसरातील रामेश्वर संपत तायडे या शेतकऱ्याचे दोन गाय व एक वासरू, कृष्ण सांडू खराते यांची एक मोठी गाय, मजहर कुरेशी यांच्या तीन गाय, युसुफ मामू यांच्या दोन गाय, युनुस शेख शब्बीर यांचे एक वासरू, सिद्धेश्वर उत्तम मोहिते यांचे दोन वासरू, तर रावसाहेब तायडे यांची एक वासरी अशी एकूण तेरा जनावरे खुरकतमुळे मृत्युमुखी पडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अगोदरच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर हा मोठा आघात मानला जात आहे.
चौकट
उपाययोजना करण्याची मागणी
पूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू असताना शेतकऱ्यांच्या जनावरांवरही लाळ खुरकत या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या आजाराची लस जनावरांना देऊनही आजार जडत असल्याने पशुधन कसे वाचवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. याकरिता पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उपाययोजना राबवाव्यात तसेच जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो : अंधारी येथे खुरकत आजाराने ग्रस्त असलेली जनावरे.
090421\rais shaikh_img-20210409-wa0071_1.jpg
अंधारी येथे खुरकुत आजाराने ग्रस्त असलेली जनावरे.