शेतकरी, अधिकाऱ्यांत बाचाबाची
By Admin | Updated: July 29, 2015 00:48 IST2015-07-29T00:45:40+5:302015-07-29T00:48:11+5:30
उस्मानाबाद : ३१ जुलैै पूर्वी पीकविमा भरण्यासाठी शहरासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसह इतर शाखांमध्ये मोठी गर्दी केली आहे़

शेतकरी, अधिकाऱ्यांत बाचाबाची
उस्मानाबाद : ३१ जुलैै पूर्वी पीकविमा भरण्यासाठी शहरासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसह इतर शाखांमध्ये मोठी गर्दी केली आहे़ शिवाय मंजूर नुकसान भरपाईची रक्कम काढण्यासाठीही बँकेत गर्दी होताना दिसत आहे़ शहरातील जिजाऊ चौक परिसरातील तांबरी विभागातील शाखेत मंगळवारी दुपारी पीकविमा भरून घेण्यास काही कर्मचाऱ्यांनी नकार दिला होता़ परिणामी तासंतास रांगेत थांबलेल्या शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली़
एकीकडे पावसाने ओढ दिल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहेत़ परिणामी शेतकऱ्यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहेत़ त्यातच पीकविमा भरण्यासाठी पीकपेरा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती़ शेतकऱ्यांकडून तक्रारी दाखल होताच जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी, कृषी सहाय्यकांनी पीकपेरा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना देण्याबाबत सूचित केले होते़ आता पीकपेरा मिळाला असला तरी काही बँकांमध्ये पीकविमा भरून घेण्यात येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत़ असाच प्रकार मंगळवारी दुपारी उस्मानाबाद येथील तांबरी विभागातील जिल्हा बँकेच्या शाखेत दिसून आला़ शहरासह घाटंग्री व परिसरातील अनेक शेतकरी पीकविमा भरण्यासाठी जिल्हा बँकेच्या शाखेत आले होते़ मात्र, तेथे उपस्थित काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी इथे पीकविमा भरून घेतला जाणार नाही़ जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत भरावा, अशा सूचना केल्या़ तसेच नुकसानीची रक्कम उचलण्यास आलेल्या शेतकऱ्यांनाही तासंतास रांगेत उभा राहूनही पैसे मिळत नसल्याने यावेळी संताप व्यक्त केला जात होता़ एकीकडे न मिळणारी नुकसानीचे अनुदान व दुसरीकडे पीकविमा भरून घेण्यास नकार देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच संताप निर्माण झाला़ उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली़ संतापलेल्या काही शेतकऱ्यांनी शाखेच्या कार्यालयाचे शटर खाली ओढून कामकाज बंद पाडले होते़ घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली़ पोलिसांनी अधिकारी व शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर व्यवहार पूर्ववत झाले़ (प्रतिनिधी)