शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा खेटे !

By Admin | Updated: July 13, 2014 00:19 IST2014-07-13T00:00:38+5:302014-07-13T00:19:21+5:30

कळंब : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ईटकुरसह काही शाखांमधील तिजोरीत पुन्हा खडखडाट निर्माण झाला

Farmers again to eat again! | शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा खेटे !

शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा खेटे !

कळंब : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ईटकुरसह काही शाखांमधील तिजोरीत पुन्हा खडखडाट निर्माण झाला असून, मागील दहा दिवसांपासून अनेक शेतकरी आपली भरपाईरुपी मदत उचलण्यासाठी बँकेत खेटे मारत आहेत. ऐन पेरणीच्या दिवसांत शेतकऱ्यांना शासनाकडून आलेली रक्कम उचलण्यासठी कसरत करावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कळंब तालुक्यातील ११ शाखांमध्ये ९६ गावातील शेतकऱ्यांना ३१ कोटी एवढी अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानपोटी अनुदान जमा झाले होते. सदर अनुदान व्यवस्थित वाटप करु असे प्रतिज्ञापत्र देणाऱ्या बँक व्यवस्थापनास अनुदान वेळेत व व्यवस्थित वाटप करण्यात यश आले हा वादाचा विषय निर्माण झाला आहे. ईटकूरसारख्या मोठ्या शाखेत तर सदर अनुदान उचलण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे.
शासनाकडून आलेले गारपीट अनुदान उचलण्यासाठी कधी शाखेत आवश्यक तेवढा कॅश उपलब्ध न होणे, कर्मचाऱ्यांचा प्रश्न तरी कधी संगणक किंवा नेटचा प्रश्न यामुळे ग्राहकांना त्रास सोसावा लागत होता. अशा प्रकारे जवळपास तीन महिन्यापासून अनुदान वाटप सुरु असताना आजही अनेक शेतकऱ्यांना आपली हक्काची रक्कम मिळाली नसल्याची वस्तूस्थिती आहे. याही परिस्थितीत यादीनुसार बँकेने शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर रकमा जमा केल्या आहेत. या रकमा शेतकऱ्यांना मिळाल्या नसल्या तरी नावे जमा झाल्याने बँक कर्मचारी वरिष्ठांना किंवा महसूल प्रशासनाला वाटपाचे मोठे आकडे सांगण्यास मोकळे होत आहेत.
बँकेने लक्ष देण्याची गरज
तालुक्यात खरिपाखालील पेरणीचे क्षेत जवळपास ७० हजार हेक्टरपेक्षा जास्त आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्राचा धनी असलेला शेतकरी मागील दोन-तीन वर्षाची टंचाईसदृश्य परिस्थिती व मध्यंतरीचा अवकाळी व गारपिटीचा तडाखा यामुळे मेटाकुटीस आला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेली मदत संपूर्ण शेतकऱ्यांच्या हातात पडली असती तर त्याचा बी-बियाणे, खत खरेदीसाठी उपयोग झाला असता. यामध्ये ज्या शेतकऱ्यांना आपल्या अनुदानाची रक्कम मिळाली. त्यांचे ठिक झाले आहे, परंतु ज्यांना आपली रक्कम मिळालेली नाही त्यांना ऐन पेरणीच्या दिवसांत बँकेत हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. बँक व्यवस्थापनाने किमान पेरणीचे दिवस डोळ्यासमोर ठेवून तरी रक्कम उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
बँकेत पुन्हा ठणठणाट
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ईटकूरसह काही शाखेत पुन्हा चलन टंचाई जागवण्यास सुरुवात झाली आहे. मागील दहा ते पंधरा दिवसापासून पुन्हा ठणठणाट जाणवत असून, असंख्य शेतकऱ्यांना या कालावधीत एक छदामही मिळालेला नाही. आपली हक्काची गारपिटीची रक्कम मिळविण्यासाठी बँकेत शेतकरी हेलपाटे मारत आहेत. बँकेत दररोज वरुन कॅश आला नाही असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. परंतु हे रहाटगाडगे किती दिवस चालणार असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.
म्हणे २९ कोटींचे वाटप ?
यासंदर्भात कळंब येथील मुख्य शाखेचे ज्येष्ठ तपासणीस सुनील गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ११ शाखेस ९६ गावातील शेतकऱ्यांसाठी ३१ कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्यापैकी २९ कोटी ४९ लाख रुपयाचे वाटप झाले असून, केवळ १ कोटी ५४ लाख रुपये वाटप करणे बाकी आहे. शिवाय ही रक्कम लवकरच वाटप करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. बँक प्रशासनाकडून सांगण्यात आलेली प्रत्यक्षात शेतकऱ्यास वाटप झाली.

Web Title: Farmers again to eat again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.