छत्रपती संभाजीनगर : परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर पत्नीनेही विष घेतल्याची घटना बुधवारी घडल्याने मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. उन्हाळ्यात २६९ शेतकऱ्यांनी जीवन संपविले असून, यामागे कर्जबाजारीपणा असल्याचे मूळ कारण असल्याचे बोलले जात आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च या तीन महिन्यांत विभागात २६९ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्या असून, दिवसाकाठी ३ आत्महत्यांचे प्रमाण आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक १०६ आत्महत्यांची नोंद झाली. शेतीचा वाढलेला खर्च, शेतमालाला भाव नसणे, नापिकी, कर्जबाजारीपणा, सावकारी कर्जांचा पाश, अतिवृष्टीमुळे होणारे शेतीपिकांचे नुकसान आदी कारणांमुळे अनेक शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
कर्जामुळे शेतकऱ्याने जीवन संपवल्यानंतर विष प्राशन केलेल्या पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू
या आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावरील उपाययोजनांचाही काही फरक पडत नसून, शेतकरी आत्महत्यांच्या घटना थांबत नाहीत. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात ८७, फेब्रुवारी महिन्यात ७६ आणि मार्च महिन्यात १०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आत्महत्या प्रकरणात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारसांना शासनाकडून १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्महत्यांच्या ७९ प्रकरणांत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत मंजूर केली आहे. १३ प्रकरणे वेगवेगळ्या कारणांमुळे अपात्र ठरली आहेत, तर १७७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.
जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्याछत्रपती संभाजीनगर - ५०जालना - १३परभणी - ३३हिंगोली - ३७बीड - ७१लातूर - १८धाराशिव - ३१एकूण - २६९