शेतमालाचा इंधन निर्मितीसाठी वापर व्हावा
By Admin | Updated: October 5, 2016 01:14 IST2016-10-05T01:00:55+5:302016-10-05T01:14:29+5:30
औरंगाबाद : शेतमालाचा जोपर्यंत केवळ खाण्यासाठी वापर होईल तोपर्यंत त्याला चांगला दर मिळूच शकत नाही. म्हणून शेतमालाचा जैव इंधन निर्मितीसाठीही वापर होणे गरजेचे आहे

शेतमालाचा इंधन निर्मितीसाठी वापर व्हावा
औरंगाबाद : शेतमालाचा जोपर्यंत केवळ खाण्यासाठी वापर होईल तोपर्यंत त्याला चांगला दर मिळूच शकत नाही. म्हणून शेतमालाचा जैव इंधन निर्मितीसाठीही वापर होणे गरजेचे आहे. शेतमालापासून इथेनॉल आणि बायो डिझेलची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे शासनाने जैव इंधन निर्मितीसाठी शेतमालाचा वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जैव इंधन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. गावोगावी असे कारखाने उभे राहिल्यास शेतमालाला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, अशी अपेक्षाही संघटनेने व्यक्त केली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई, राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा सुजाता देसाई आणि त्यांचे काही सहकारी औरंगाबाद शहरात आले आहेत. शामराव देसाई हे मागील दहा वर्षांपासून या मागणीबाबत शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. ते म्हणाले, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर आणि हमीभाव ही संकल्पना आता बाद झाली आहे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळण्यासाठी शेती उत्पादने फक्त अन्न म्हणून वापरून चालणार नाही. त्यासोबतच त्याचा वापर इथेनॉल आणि बायो डिझेल निर्मितीसाठी करावा लागेल.
असेही पृथ्वीच्या पोट्यातील इंधन संपणार आहे. त्यामुळे आतापासून शेतमालाचा वापर इंधन निर्मितीसाठी व्हायला हवा. गोड ज्वारी (स्वीट सोरगम), मका यासारख्या अनेक पिकांपासून इथेनॉलची निर्मिती करता येते. शासनाने शेतमालाचा जैव इंधन निर्मितीसाठी वापर करण्याची परवानगी देण्याची गरज आहे. तशी परवानगी दिल्यास असे कारखाने सुरू होऊन शेतकऱ्यांना भाव मिळेल. त्यामुळे शेतकरी आत्महत्याही थांबतील. वाजपेयी सरकारच्या काळात शेतमालापासून जैव इंधन निर्मितीची परवानगी देण्यात आली होती, असेही देसाई यांनी सांगितले.