अधिकाऱ्यासमोर शेतकऱ्याने केले विष प्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 01:03 IST2016-05-10T00:50:20+5:302016-05-10T01:03:23+5:30
जायकवाडी : जायकवाडीतून होणारी पाणीचोरी शोधण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या महावितरण व पाटबंधारे पथकाला पाहून येथील अंकुश बोबडे

अधिकाऱ्यासमोर शेतकऱ्याने केले विष प्राशन
जायकवाडी : जायकवाडीतून होणारी पाणीचोरी शोधण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या महावितरण व पाटबंधारे पथकाला पाहून येथील अंकुश बोबडे यांनी विष प्राशन केल्याची घटना सोमवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण व पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत अधिकारी व कर्मचारी एमआयडीसी पैठण ठाण्यात दाखल झाल्याने ठाण्यात गोंधळ उडाला.
विषप्राशन केलेल्या शेतकऱ्यावर औरंगाबादेतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावरील कृषी पंपाचा वीजपुरवठा पाच दिवसांपूर्वी महावितरण व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंद केला होता. खंडित पुरवठा शेतकऱ्यांनी जोडला तर नाही ना याची पाहणी करण्यासाठी हे पथक सायंकाळी कालवा परिसरात फिरत होते. उपशाखा अभियंता बुद्धभूषण दाभाडे, कालवा निरीक्षक सुनील घुसारे, महावितरणचे बन्सी नगराळे यांच्यासह इतर कर्मचारी कृषी पंपाच्या वीज खांबाकडे जात असल्याचे पाहताच या ठिकाणी उभे असलेले अंकुश बोबडे यांनी पथकाला विरोध करत त्यांच्या समोरच विष प्राशन केले. ही वार्ता कळताच शेकडो शेतकरी महाविरणच्या उपकेंद्राकडे धावले. त्यांनी तेथील कर्मचारी बन्सी नगराळे व इतरांना मारहाण करत रास्ता रोको सुरू केला.
कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव व महावितरणचे महादेव मोरताळे यांनी एमआयडीसी ठाण्यात येऊन मारहाण करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याचवेळी मुधलवाडी, कातपूर, वाहेगाव, पाचलगाव, वरुडी, नारायणगाव आदी गावातील शेतकरी ठाण्यात आले. त्यांनीही अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.