नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:23+5:302020-12-17T04:29:23+5:30
अशोक भावले हे पैठण तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक होते. त्यांची आडूळ बु. येथे गावालगतच गट क्र. २५९ ...

नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
अशोक भावले हे पैठण तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक होते. त्यांची आडूळ बु. येथे गावालगतच गट क्र. २५९ मध्ये १ हेक्टर ३२ आर जमीन आहे. या जमिनीवर बँकेचे थकीत कर्ज होते. तसेच यावर्षी वारंवार झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. झालेला खर्च सुद्धा शेतीच्या उत्पन्नातून निघाला नसल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून सतत चिंतेत राहत होते. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांची दोन्ही मुले मोलमजुरी करतात. सद्यस्थितीत अतिवृष्टीने शेतातील कपाशीचे नुकसान झाल्यानंतर त्यांनी कपाशी उपटून गहू पेरला होता; परंतु त्यावरही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ते नैराश्यात गेले होते. यातच त्यांनी सोमवारी सकाळी टोकाची भूमिका घेऊन स्वत:च्या शेतातील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी शेतात जाणाऱ्या मजुरांना झाडावर त्यांचे प्रेत लटकताना दिसले. आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून सपोनि. अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र क्षीरसागर, विश्वजित धनवे पुढील तपास करीत आहे.
फोटो आहे.