फरहत परवीनची गुणवत्ता अडकली गरिबीच्या फेऱ्यात
By Admin | Updated: July 5, 2017 00:19 IST2017-07-05T00:04:09+5:302017-07-05T00:19:42+5:30
हदगाव : घरात अठराविश्वे दारिद्र्य. खायचीही भ्रांत नाही, अशाही परिस्थितीवर मात करुन नाव कमाविणारे फार कमी आहेत. यात रजानगर, हदगावच्या फरहत परवीन शेख हिचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

फरहत परवीनची गुणवत्ता अडकली गरिबीच्या फेऱ्यात
सुनील चौरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : घरात अठराविश्वे दारिद्र्य. खायचीही भ्रांत नाही, अशाही परिस्थितीवर मात करुन नाव कमाविणारे फार कमी आहेत. यात रजानगर, हदगावच्या फरहत परवीन शेख हिचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. दहावीत तिने ९५ टक्के गुण मिळविले, आता मात्र पुढील शिक्षण घेण्याची ऐपत नसल्याने तिची गुणवत्ता गरिबीच्या फेऱ्यात अडकली आहे. तिला सामाजिक वा दानशूर मंडळींच्या आधाराची आवश्यकता आहे.
रजानगर भागात गुलाब शेख यांचे कुटुंबिय राहते. केवळ पाच हजार रुपये प्रतिमाह मानधनावर गुलाब शेख आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. साध्या मेणकापडाच्या घरामध्ये कुटुंब राहते़ घरात वीज नाही, टीव्ही नाही़, मोबाईल नाही़ विज्ञान युगाचे वारे सर्वत्र वाहत असताना या कुटुंबाकडे भौतिक सुखाची कोणतीच व्यवस्था नाही़ वडील मशीदमध्ये कुराण (पोथी) वाचण्याचे काम करतात़ लहान मुलांना जीवनात उसंत मिळावी म्हणून वयस्क माणसाच्या समस्येचे समाधान करण्याचे काम ते दिवसरात्र करीत असतात़ त्यासाठी महिन्याकाठी चार-पाच हजार रुपये त्यांना मिळतात़ अशा बिकट परिस्थितीमध्ये लक्ष्मीचा वास नसणाऱ्या कुटुंबाकडे सरस्वती प्रसन्न झाली़
दहावीच्या परीक्षेत फरहत ९५ टक्के गुण घेईल, याची पुसटशीही कल्पना गुलाब शेख वा त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना नव्हती.
दहावीच्या निकालानंतरच या मुलीची गुणवत्ता मोहल्ल्यासह शाळेला कळाली़ आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गुलाब शेख यांनी फरहत हिचे पुढील शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र चिखलात कमळ फुलावे, त्याप्रमाणे फरहत गुणवत्तेने उजळली. निकाल लागल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला़ मात्र खऱ्या अर्थाने तिच्या खडतर जीवनाचा प्रवास आता सुरु होणार आहे.
कारण ११ वी विज्ञानला प्रवेश घेण्यासाठी तिच्याकडे पैसे नाहीत. कुठे पाच हजार तर कुठे सात हजार बिल्डींग फंड म्हणून प्रवेशासाठी घेतले जात आहेत़
त्यानंतर ट्यूशनसाठी एका विषयाला पाच हजार याप्रमाणे चार विषयांचे २० ते ३० हजार रुपये, शालेय साहित्य तिने आणायचे कुठून, असा प्रश्न या कुटुंबाला पडला आहे़