जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रसिद्ध
By Admin | Updated: May 11, 2016 00:52 IST2016-05-11T00:33:10+5:302016-05-11T00:52:29+5:30
औरंगाबाद : शहरात दररोज चारशे टन कचरा जमा होतो. मागील अनेक वर्षांपासून महापालिका नारेगाव येथील डेपोवर हा कचरा प्रक्रिया न करता टाकत आहे

जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रसिद्ध
औरंगाबाद : शहरात दररोज चारशे टन कचरा जमा होतो. मागील अनेक वर्षांपासून महापालिका नारेगाव येथील डेपोवर हा कचरा प्रक्रिया न करता टाकत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या एका अहवालात औरंगाबादेत दूषित कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा अहवाल राज्य शासनास सादर केला आहे. जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सोमवारी मनपाने निविदा प्रसिद्ध केली.
नियानुसार महापालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करायला हवी. निधी नसल्याचे कारण दाखवून आजपर्यंत मनपाने ही जबाबदारी टाळली. मागील आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजनेचा आढावा घेण्यात आला. या आढाव्यात सुलभ शौचालय, कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रक्रियेत औरंगाबाद शहर इतर शहरांच्या तुलनेत बरेच मागे असल्याचे निदर्शनास आले. शासनाने मनपा अधिकाऱ्यांजवळ तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत कामात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये जैविक कचऱ्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. सुका, प्लास्टिक कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्लास्टिकपासून आॅईल तयार करण्याचे तंत्रही विकसित झाले आहे. मनपाच्या या निविदा प्रक्रियेला किती कंपन्या प्रतिसाद देतात यावर बरेच काही अवलंबून आहे.