कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया लादली जातेय महिलांवरच !
By Admin | Updated: May 27, 2015 00:40 IST2015-05-27T00:25:48+5:302015-05-27T00:40:45+5:30
लातूर : कुटुंब नियोजनाचे वार्षिक उद्दिष्ट लातूर जिल्ह्यात ९४ टक्के साध्य झाले आहे. मात्र कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया महिलांवरच लादली जात आहे.

कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया लादली जातेय महिलांवरच !
लातूर : कुटुंब नियोजनाचे वार्षिक उद्दिष्ट लातूर जिल्ह्यात ९४ टक्के साध्य झाले आहे. मात्र कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया महिलांवरच लादली जात आहे. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पुरुष करीत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या वर्षभरात केवळ १९ टक्के पुरुषांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे.
लातूर जिल्ह्यासाठी १६ हजार २६० कुटुंब नियोजनाचे वार्षिक उद्दिष्ट होते. त्यापैकी १३ हजार ७७२ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. १५ हजार २३५ प्रगतीपथावर असून, वार्षिक उद्दिष्ट ९४ टक्के साध्य झाले आहे. मात्र कुटुंब नियोजनाच्या या सर्व शस्त्रक्रिया महिलांनीच करून घेतल्या आहेत. पुरुष नसबंदी नगण्य आहे. ८२१ पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट होते. त्यापैकी केवळ १५३ पुरुष नसबंदी झाली आहे.
दोन अपत्यांवरील कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे वार्षिक उद्दिष्ट १० हजार ७७४ होते. त्यापैकी ८ हजार ११५ साध्य झाले आहे. ६० टक्के हे उद्दिष्ट साध्य झाले असून, ९ हजार १३४ कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया प्रगतीपथावर आहेत. २०१३-१४ मध्येही पुरुष शस्त्रक्रिया केवळ १६१ झाल्या होत्या. २०१२-१३ मध्ये १५७ पुरुष शस्त्रक्रिया झाल्या. तर २०११-१२ मध्ये ८४ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया झाली.
एकंदर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया महिलांवरच लादली जात आहे. त्यातच दोन अपत्यांवर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. सरासरी ६० टक्क्यांच्या पुढे हे प्रमाण नाही. दोन अपत्यांच्या पुढील व दोन अपत्यांवर असे मिळून कुटुंब नियोजनाचे प्रमाण सरासरी ९४ टक्के असले, तरी त्यामध्ये कुटुंब नियोजनाची सर्व जबाबदारी पती घेत नाहीत. पत्नीच कुटुंब नियोजन करून घेते, असे आरोग्य विभागाच्या या अहवालावरून समोर आले आहे. गतवर्षी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी जनजागृती केली होती. काही अधिकाऱ्यांनीही नसबंदी करून घेतली. मात्र पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचा आकडा वाढू शकला नाही, हे सत्य. (प्रतिनिधी)