पावणेपाचशे कुटुंबांना मिळणार हक्काचा निवारा !
By Admin | Updated: April 2, 2017 23:38 IST2017-04-02T23:34:20+5:302017-04-02T23:38:52+5:30
उस्मानाबाद : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास घरकुल योजना (शहरी) राबविण्यात येते.

पावणेपाचशे कुटुंबांना मिळणार हक्काचा निवारा !
उस्मानाबाद : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास घरकुल योजना (शहरी) राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत आठ पालिकांकडे मिळून ५२९ कुटुंबांनी प्रस्ताव दाखल केले असता जिल्हास्तरीय समितीने ४८२ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामुळे सर्वाधिक ४०६ प्रस्ताव उस्मानाबाद शहरातील आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात उपरोक्त ४८२ कुटुंबांना हक्काचा निवारा मिळणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना पक्का निवारा उपलब्ध करून दिला जातो. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून ५२९ कुटुंबियांनी त्या-त्या पालिकेकडे प्रस्ताव दाखल केले होते. यामध्ये उस्मानाबाद पालिकेला ४२९, तुळजापूर १९, नळदुर्ग ६, उमरगा ३०, कळंब १६, भूम १, परंडा ४, तर मुरूम पालिकेकडे २४ प्रस्ताव प्राप्त होते.
या सर्व प्राप्त प्रस्तावांची छाननी केली असता ४७ प्रस्ताव अपूर्ण असल्याचे समोर आले. यात उस्मानाबाद २३, उमरगा ८, कळंब ५, भूम १ आणि मुरूम शहरातील १० कुटुंबांच्या प्रस्तावांचा समावेश आहे. त्यामुळे समितीने ४८२ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामुळे उस्मानाबाद शहरातील सर्वाधिक ४०६ प्रस्ताव आहेत. त्यानंतर तुळजापूर १९, नळदुर्ग ६, उमरगा २२, कळंब ११, परंडा ४ आणि मुरूम शहरातील १४ प्रस्ताव आहेत. सदरील घरकुलांची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे समाजकल्याण निरीक्षक पी. एच. पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)