अर्धवट नावांचा ठरतोय अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:25 IST2017-09-24T00:25:28+5:302017-09-24T00:25:28+5:30
जिल्ह्यातील सातबारा उताºयांवर अर्धवट नावे असल्याने हे सातबारा उतारे संगणकीकृत करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

अर्धवट नावांचा ठरतोय अडथळा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील सातबारा उताºयांवर अर्धवट नावे असल्याने हे सातबारा उतारे संगणकीकृत करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
महसूल विभागाच्या वतीने शेत जमिनीसाठी सातबारा उतारा दिला जातो. या उताºयांवर बहुतांश ठिकाणी स्वत:चे नाव आणि वडिलांचे नाव एवढाच उल्लेख असल्याने ही सातबारा नेमकी कोणाची हे शोधताना महसूल प्रशासनाला अडचणी येत आहेत. छोट्या गावांमध्ये मूळ मालक शोधणे शक्य आहे. परंतु, मोठ्या लोकसंख्येची गावे आणि शहरी भागात मात्र मूळ मालकांना शोधणे अवघड जात आहे. तसेच एकाच नावाची अनेक कुटुंबे असल्याने या अडचणीत भर पडली आहे.
सध्या जिल्हा प्रशासनाने सातबाराचे संगणकीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. संगणकामध्ये सातबाराची माहिती जमा करीत असताना अनेक सातबारांना आडनावच नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे भविष्यात मोठी अडचण निर्माण होऊ शकते. अर्धवट सातबारा उतारा बँक किंवा इतर कार्यालयातही नाकारला जातो. तेव्हा सातबारा उताºयावर नाव लावून घेण्यासाठी खातेदारांनी आपल्या गावच्या तलाठ्याशी संपर्क साधावा, त्यांना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन सातबारा अद्ययावत करुन घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.